सांगावे पोलिसांनी, सोसावे किती अमरावतीकरांनी?

By admin | Published: November 24, 2014 10:48 PM2014-11-24T22:48:21+5:302014-11-24T22:48:21+5:30

रविवारचा गोळीबार शहरातील शांतता भंग करून गेला. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या या इंद्रपुरीत सामान्य माणसाचा डोळा अलिकडच्या काळात तसाही निवांतपणे मिटू शकलेला नाही.

Police should tell, how many Amravati people have? | सांगावे पोलिसांनी, सोसावे किती अमरावतीकरांनी?

सांगावे पोलिसांनी, सोसावे किती अमरावतीकरांनी?

Next

गणेश देशमुख - अमरावती
रविवारचा गोळीबार शहरातील शांतता भंग करून गेला. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या या इंद्रपुरीत सामान्य माणसाचा डोळा अलिकडच्या काळात तसाही निवांतपणे मिटू शकलेला नाही. काळजात धस्स व्हावे अशा गुन्हेगारी कारवायांची मालिकाच शहरात सुरू झाली आहे. गुन्हेगारांवरील धाक गमावलेल्या शहर पोलिसांच्या डोळ्यांदेखत दबदबा निर्माण करण्याची होडच जणू असामाजिक तत्त्वांमध्ये लागली आहे.
रविवारी पठाणपुऱ्यातील चांदणी चौकात भरदिवसा गोळीबार झाला. पूर्वी शेख जफरसोबत राहणाऱ्या अहेफाज खानने त्याचे गुन्हेगारीतील स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ही 'फायरींग' केली. लोकांनी ती बघितली. लोकांनी बघावी याच उद्देशाने त्याने ती केलीही होती. या घटनेनंतर कुटुंबियांसोबत घालविण्यासाठी मिळणारा हक्काचा रविवार शहरवासियांना दहशतीच्या छायेत घालवावा लागला. 'भाईगिरी'ला विटलेल्या सामान्य माणसाच्या काळजात आणखी एकदा धस्स झाले. 'गँगवार'चे भय अस्वस्थ करून गेले.
कुण्या गुंडाने स्वत:च्या टोळीचा दबदबा निर्माण करण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी मुद्दामहून 'फायरींग' करावे ही घटनाच अमरावती शहर पोलिसांची गुन्हेगारी नियंत्रणावरील पकड सुटल्याचे जाहीर करणारी आहे. रविवारच्या घटनेतील गांभीर्य येथेच संपत नाही. फायरींगनंतर शेख जफर टोळीचा सदस्य शेख नईम आणि विरोधी टोळीचा म्होरक्या अहेफाज खान हे नागपुरी गेट पोलीस ठाण्यासमोर तक्रार नोंदविण्याच्या निमित्ताने आमनेसामने आले. तेथेच त्यांनी एकमेकांशी 'फ्री स्टाईल' सुरू केली. महत्प्रयासांनी पोलिसांनी त्यांना रोखले.
ज्यांच्या खांद्यावर निवांत मान ठेवता यावी, ज्यांच्या भरवशावर सुरक्षिततेची खात्री बाळगता यावी, त्या पोलिसांचे शक्तिस्थळ असलेल्या पोलीस ठाण्यासमोरच एकमेकांशी भिडताना गुन्हेगारांना यत्किंचितही भय वाटत नसेल तर सामान्यजनांनी त्याचा काय अर्थ काढावा?
गुन्हेगारांच्या टोळ्या शहरात सक्रीय असतात. त्यांच्याकडे बंदुका असतात. टोळ्या निर्माण करण्याच्या ते योजना आखतात. दबदबा निर्माण करण्यासाठी भरवस्तीत फायरींग करण्याचे इरादे ते बाळगतात. नियोजितपणे फायरींग करतात. अपेक्षित असलेली दहशत निर्माण करतात. पुन्हा उजळ माथ्याने तक्रार करण्यासाठी पोलीसठाणे गाठतात. ‘डॉन’पणा सिद्ध करण्यासाठी तेथेही एकमेकांशी भिडतात आणि आमच्या पोलिसदलाला यापैकी एकाही घटनेची खबरबात नसते. सुमारे दोन हजार पोलिसांचा फौजफाटा हाताशी असताना गुन्हेगारांच्या या कारवायांची 'टीप'ही मिळू शकत नसेल तर यालाच म्हणायचे काय पोलिसिंग, असा प्रश्न पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांना विचारावासा वाटतो.

Web Title: Police should tell, how many Amravati people have?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.