गोदरीतून थेट पोलीस ठाण्यात
By Admin | Published: February 21, 2017 12:01 AM2017-02-21T00:01:52+5:302017-02-21T00:01:52+5:30
पहाटेच्यावेळी उघड्यावर शौचास बसणाऱ्या आठ नागरिकांना अचलपूर नगर पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य पथकाने थेट पोलीस ठाण्यात नेऊन ....
परतवाडा : पहाटेच्यावेळी उघड्यावर शौचास बसणाऱ्या आठ नागरिकांना अचलपूर नगर पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य पथकाने थेट पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल केल्याने सोमवारी उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली.
उघड्यावर शौचास बसल्याप्रकरणी फौजदारी कारवाईची जिल्ह्यातील बहुधा ही पहिलीच घटना आहे. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
सोमवारी सकाळी ९ वाजता अचलपूर शहरातील जीवनपुरा, मेहराबपुरा, नौबागपुरा परिसरात उघड्यावर शौचास बसलेल्या नागरिकांना पकडून पालिकेच्या आरोग्य, स्वच्छता विभागाने पकडून थेट पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा ११५, ११७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
न.प. पथकाची कारवाई : उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल
गुलाब पुष्प ठरले निरूपयोगी
अचलपूर नगर पालिकेच्यावतीने मागील काही वर्षांपासून जुळ्या शहरातील नागरी वस्त्यांमधील रहिवाशांना शासनाच्या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात शौचालये बांधून देण्यात आली. शंभर टक्के हगणदारीमुक्त झालेल्या परिसरात उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांना पालिकेच्या पथकाने ृगुलाब पुष्प दिले. मात्र, या उपक्रमाचा काहीही फायदा झाला नाही. परिणामी सोमवारी त्यांना थेट पोलिसांत नेऊन गुन्हे दाखल केलेत.
‘लोेटा’ घेऊन पळापळ
सोमवारी सकाळी पालिकेच्या आरोग्य पथकातील कर्मचारी, मुख्याधिकारी प्रदीप जगताप यांच्या नेतृत्वात आरोग्य निरीक्षक उस्मान खान, संजय समुंद, सागर तांबे, संजय बोबडे, शे. इरफान, कैलास वानखडे, नंदलाल बुंदेले, राम दांडगे आदींचे पथक जीवनपुरा, नौबाग, मेहरापुरा परिसरात उघड्यावर शौचास बसलेल्या व्यक्तींजवळ जाताच अनेकांची पंचाईत झाली. पथक येत असल्याचे पाहून लोटे सोडून काहींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.
दिवसाला
१२०० रुपये दंड
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाईचे प्रावधान करण्यात आले आहे. त्यामध्ये फौजदारी संहितेनुसार सहा महिने कारावास आणि प्रतिदिन बाराशे रूपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. जुळ्या शहरातील नागरिकांमध्ये यामुळे खळबळ उडाली आहे.
शौचालय योजनेंतर्गत शहरातील सर्व नागरिकांना योजनेचा लाभ दिला जातो. सोबतच सार्वजनिक शौचालयांचा वापर टाळून उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे.
-प्रदीप जगताप,
मुख्याधिकारी, न.प. अचलपूर