पोलीस शिरले समोरून, चोर पळाले घरामागून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 11:14 PM2017-11-08T23:14:40+5:302017-11-08T23:15:06+5:30
पोलीस एका घरात समोरून शिरले आणि मागील दाराने चोर पळाल्याचा प्रकार सातुर्णा स्थित गुप्ता ले-आऊटमधील रहिवासी अरुण प्रल्हाद मोहोड यांच्याकडे घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पोलीस एका घरात समोरून शिरले आणि मागील दाराने चोर पळाल्याचा प्रकार सातुर्णा स्थित गुप्ता ले-आऊटमधील रहिवासी अरुण प्रल्हाद मोहोड यांच्याकडे घडला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरांचा घरफोडीचा प्रयत्न फसला.
घरफोडी व चोरीच्या वाढत्या घटनांच्या अनुषंगाने पोलीस सतर्कतेने पेट्रोलिंग करीत आहेत. प्रत्येक घरावर पोलीस बारीक नजर ठेवत असून, संशयास्पद आढळल्यास तत्काळ शहानिशा करीत आहेत. या अनुषंगाने राजापेठचे पोलीस शिपाई दानिश शेख व अमोल खंडेझोड हे सातुर्णा ते क्रांती कॉलनी मार्गातील गुप्ता ले-आऊट परिसरात मंगळवारी रात्री दुचाकीने गस्त लावत होते. त्यांना डेप्युटी सीईओ अशोक मोहोड यांच्या घराचे दार बंद होते, तर फाटकाला बाहेरच्या बाजूने कुलूप असल्याचे आढळून आले. त्यामुळे अमोल खंडेझोड भिंतीवरून आत डोकावले, तर दानिश शेख हे शेजारी विचारणा करण्यासाठी गेले. यावेळी अमोल खंडेझोड व घरात शिरलेल्या चोराची नजर भिडली. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी पुढील दारातून घरात प्रवेश केला. तोपर्यंत चोर मागील दाराने पळून जाण्यात यशस्वी झाला. चोराने घरामागील जगंल परिसरात धूम ठोकली होती. पोलिसांनी काही अंतरापर्यंत त्याचा पाठलाग केला. मात्र, त्याच्यापर्यंत ते पोहोचू शकले नाहीत. राजापेठ ठाण्यातील पोलीस ताफा उशिरा रात्री घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली होती.
सातुर्णा येथील प्रकार : डेप्युटी सीईओकडे चोरीचा प्रयत्न
१२ लाखांचा ऐवज बचावला
अशोक मोहोड हे यवतमाळ येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. बुधवारी ते काही कामानिमित्त घराबाहेर होते. त्यांनी समोरच्या दाराला व फाटकाला कुलूप लावले होते. चोरांना दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांच्या घरात सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा सुमारे १२ लाखांचा मुद्देमाल होता. पोलिसांच्या सतर्कतेने हा मुद्देमाल सुरक्षित राहिला.