पोलिसांच्या वाहनाची मजुरांना धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 01:12 AM2019-05-06T01:12:24+5:302019-05-06T01:13:15+5:30
शिरखेड पोलिसांच्या वाहनाने दिलेल्या धडकेत दोन मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना तळेगाव दाभेरीनजीक रविवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली. त्या दोन मजुरांना अत्यवस्थ स्थितीत नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरपिंगळाई : शिरखेड पोलिसांच्या वाहनाने दिलेल्या धडकेत दोन मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना तळेगाव दाभेरीनजीक रविवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली. त्या दोन मजुरांना अत्यवस्थ स्थितीत नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अनिस खाँ इलियास खाँ (३८) व अमजद खाँ रहमान खाँ (३४) अशी जखमी मजुरांची नावे आहेत. याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
रविवारी चांदूरबाजार येथे आठवडी बाजारात गुरांचा बाजार भरतो. तेथे चोरीच्या जनावरांचीही विक्री होत असल्याचाही संशय आहे. त्याअनुषंगाने शिरखेड पोलीस एमएच २७ ए ६३६ या शासकीय वाहनाने या मार्गे जनावरे वाहून नेणाऱ्या वाहनाचा पाठलाग करीत होते. पोलीस वाहनाने नेरपिंगळाई येथील रोजगार हमीच्या कामावरील अनिस खाँ व अमजद खाँ यांच्या दुचाकीला (एमएच २७ एएन ११३२) धडक दिली. दोन्ही मजूर वाहनावरून फेकले गेले. पोलीस व ग्रामस्थांनी त्यांना तातडीने दवाखान्यात हलविले. राजिक शाह (रा. नेरपिंगळाई) यांच्या तक्रारीवरून शिरखेड पोलिसांनी चालक सुदाम साबळे याच्याविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला. ठाणेदार केशव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली.