चायना चाकूच्या ऑर्डरपासून डिलिव्हरीपर्यंत पोलिसांचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:12 AM2021-07-31T04:12:34+5:302021-07-31T04:12:34+5:30
पान १ अमरावती : ज्या शस्त्राच्या पात्याची लांबी ९ इंचांपेक्षा कमी आहे, अशा चायना चाकू म्हणून प्रचलित असणाऱ्या शस्त्रांच्या ...
पान १
अमरावती : ज्या शस्त्राच्या पात्याची लांबी ९ इंचांपेक्षा कमी आहे, अशा चायना चाकू म्हणून प्रचलित असणाऱ्या शस्त्रांच्या ऑनलाईन ऑर्डरपासून डिलिव्हरीपर्यंत पोलिसांचा ‘वॉच’ राहणार आहे. चायना चाकू, छोटे चाकू हे डोमेस्टिक अप्लायन्सेसमध्ये मोडत असल्याने त्याची सर्रास ‘ऑर्डर’ नोंदविली जात आहे. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी संबंधित कंपन्यांना नावे आदेश काढून ते तातडीने ई-मेल केले आहेत.
अमरावती शहरातून ऑनलाईन शस्त्रे खरेदीची ऑर्डर नोंदविण्यापासून डिलिव्हरीपर्यंतची संपूर्ण माहिती संबंधित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, कंपन्यांना अमरावती शहर पोलीस आयुक्तांच्या ई-मेलवर सादर करावी लागणार आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्याच्या परिसरात हा आदेश अमलात राहणार आहे. या आदेशाबाबत काही आक्षेप असल्यास ते २८ जुलैच्या पुढील ३० दिवसांत ‘सीपी डॉट अमरावती सिटी ॲट महापोलीस जीओव्ही डॉट इन’ या ई-मेल आयडीवर नोंदवावे लागणार आहेत. चायना चाकूच्या वाढत्या बेकायदा वापरावर निर्बंध घालण्यासाठी हे आदेश काढण्यात आले आहेत.
डिक्कीवर विशेष लक्ष
१७ ते पुढे २५ वर्षे वयोगटातील काही तरुणांकडे हमखास चायना चाकू असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. एक आठवड्यात घडलेल्या खुनाच्या तीनही घटनांमध्ये चायना चाकूच वापरला गेला. त्यामुळे शहरातील दहाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी व रोज पहाटे ४ ते ७ या कालावधीत कोम्बिंग ऑपरेशन राबविले जात आहे. त्यात अनेकांकडून चायना चाकू व अन्य धारदार शस्त्र हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.