मोफत कुल्फी खाणाऱ्या पोलिसांची होणार चौकशी
By admin | Published: April 18, 2016 12:04 AM2016-04-18T00:04:40+5:302016-04-18T00:04:40+5:30
पंचवटी चौकात रात्री उशिरापर्यंत फूटपाथवर कुल्फी विकणाऱ्या महिलेला हटकून तिच्या जवळील मोफत कुल्फी खाणे पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले आहे.
डीसीपींनी घेतली दखल : कुल्फ ी विकणाऱ्या महिलेचे नोंदविले बयाण
अमरावती : पंचवटी चौकात रात्री उशिरापर्यंत फूटपाथवर कुल्फी विकणाऱ्या महिलेला हटकून तिच्या जवळील मोफत कुल्फी खाणे पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले आहे. यासंदर्भाची दखल पोलीस उपआयुक्त सोमनाथ घार्गे यांनी घेतली असून शनिवारी त्या कुल्फी विकणाऱ्या महिलेचे बयाण नोंदविण्यात आले आहे. पोटची खळगी भरण्यासाठी गाडगे नगरातील एक महिला आपल्या मुलांसह पचंवटी चौकातील फुटपाथवर थंडी कुल्फ ी विकण्याचा व्यवसाय करते. त्यातून ती आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करते. परंतु पाच दिवसांपूर्वी गस्तीवर असलेल्या मोवाईल व्हॅनमध्ये आलेल्या पोलिसांनी तिला हटकले व हा कुल्फी विकण्याचा व्यवसाय बंद करण्याचे फर्मान सोडले. ते एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी कुल्फ्या मोफत खाल्ल्यात. त्या महिलेच्या मुलाने वाहनातील सर्व पोलिसांना कुल्फ्या नेऊन दिल्या व पैसे न देता ते पोलीस तेथून निघून गेले. हा प्रकार 'लोकमत'ने सहचित्र उघडकीस आणला. ते येथेच थांबले नाहीत, तर भररस्त्यात पोलीस व्हॅन उभी केली व राजोरसपणे कायद्याचे उल्लंघन केले. जर पोलीसच असे कारनामे करीत असतील तर सामान्य नागरिकांकडून काय अपेक्षा ठेवावी, अशी प्रतिक्रिया अमरावतीकरांची होती. अमरावती शहरात अनेक वेळा छोट्या-मोठ्या व लहान व्यावसायिकांना धाकधपट करून त्यांच्याकडून विनामूल्य साहित्य घेण्याचा प्रकार काही नवीन नाही. परंतु आपण एकीकडे महिला सक्षमीकरणाचे धडे देतात व नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, ते पोलीसच असा प्रकार करीत असतील तर याला काय म्हणावे, अशी भावना व्यक्त होत आहे.
१०० रुपयांच्या कुल्फ्या खाणारा तो पोलीस कोण?
मला माझ्या कुटुंबीयांसाठी १०० रुपयांच्या कुल्फ्या पाहिजे नाहीतर तुला या ठिकाणी कुल्फ ी विक्रीचा व्यवसाय करू देणार नाही, अशी धमकी देऊन १०० रुपयांच्या कुल्फ्या घेऊन जाणारा तो अल्पसंख्यक पोलीस कोण, असा प्रश्न विचारला जात आहे. या पोलिसांमुळे सदर महिला त्रस्त असून तशी भावना तिने शुक्रवारी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी या पोलिसाचाही शोध घ्यायला हवे, अशी प्रतिक्रिया आहे.
कुल्फीसंदर्भातील प्रकरणात 'त्या' महिलेचे बयाण नोंदविण्यात आले आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनाही विचारणा केली जाईल.
- सोमनाथ घार्गे,
पोलीस उपआयुक्त, अमरावती