अमरावतीमध्ये दाेन दिवसात दाेन पाेलिसांच्या आत्महत्या... पाेलीस दलात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2022 03:23 PM2022-05-12T15:23:40+5:302022-05-12T15:50:09+5:30
दोन दिवसात दोन पोलिसांच्या आत्महत्येच्या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
अमरावती : जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या २ दिवसात जिल्ह्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना समोर आल्या असून पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
खल्लार पोलीस ठाण्यात कार्यरत बाळकृष्ण राठोड (वय ५०) या पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुख्यालयाच्या चौथ्या माळ्यावरून उडी घेतली. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप पुढे आलेले नाही. घटनेचा तपास दर्यापूर पोलीस करत आहेत. काल वलगाव येथील एका पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. या घटनेला २४ तास उलटत नाही तोच पुन्हा एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन-दोन पोलिसांच्या आत्महत्येच्या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस खात्यात चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
काल वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक उपनिरीक्षक विजय किसनराव अडोकार गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी त्यांच्या मुलानी पोलिसात तक्रार दाखल केली होती. आपल्या वडिलांनी बदलीसाठी वारंवार विनंती केली. मात्र, वलगावच्या ठाणेदारांनी त्यांना बदलीसाठी नाहक त्रास दिला. बदली न करता त्यांना निलंबनाची धमकी देण्यात आली. तो त्रास सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्यात यावी, असा तक्रार अर्ज मृताचा मुलगा केतन अडोकार यांनी फ्रेजरपुरा पोलिसांत दिला. तर, आज आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने पोलीस वर्तुळ हादरले आहे.