देश-विदेशातून अमरावतीत आलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 11:10 PM2018-08-27T23:10:39+5:302018-08-27T23:11:19+5:30
माहिती मागविली : पारपत्र विभागाचे पोलीस ठाण्यांना पत्र
वैभव बाबरेकर
अमरावती : देश-विदेशातून शिक्षणासाठी शहरात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची पोलिसांनी माहिती मागविली असून, त्यासंबंधाने राजापेठ, फेरजरपुरा व गाडगेनगर पोलिसांना पत्र पाठविले आहे. अमरावतीत किती विद्यार्थी शिकतात, ते कुठचे आहेत, कुठे शिकत आहेत, अशाप्रकारचे माहिती प्रारुप आहे.
अमरावती शहरातील प्रसिध्द शैक्षणिक संस्थांमध्ये देश-विदेशातून अनेक विद्यार्थी शिकायला येतात. मात्र, त्यांची माहिती किंवा नोंद स्वत:हून कोणीच पोलिसांकडे करीत नव्हते. देश-विदेशातील नागरिक लाँग टर्म व्हिजासाठी पारपत्र विभागाकडे येतात. मात्र, देश-विदेशातून शिक्षणासाठी अमरावतीत येत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, याची माहिती पोलिसांकडे नव्हती. आता अशा विद्यार्थ्यांची माहिती काढण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. शहरातील शैक्षणिक संस्थेत शिकणारे विद्यार्थी कोठून आले, केव्हा आले आणि काय शिक्षण घेत आहे, त्यांची निश्चित संख्या कीती, याची इत्थंभूत माहिती गोळा करण्याचे काम आता पोलिसांनी सुरू केले आहे. शहरातील घडामोडी लक्षात घेता, काही घटना घडल्यास देश-विदेशातील नागरिकांची माहिती असणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने ही माहिती मागविण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
शहरात १५९ एलटीव्हीवर
विदेशातून अमरावती शहरात दाखल झालेल्या १५९ नागरिकांची नोंद पारपत्र विभागाकडे आहे. त्यांच्याकडे लाँग टर्म व्हिजा (एलटीव्ही) असून, दरवर्षी त्यांना नूतनीकरण आवश्यक असते. पारपत्र विभागाकडून त्यांचे अर्ज शासनाच्या संबंधित विभागाला पाठविण्यात येतात.