चोऱ्यांच्या तपासाकरिता आता पोलिसांचे स्वतंत्र पथक
By admin | Published: March 29, 2016 12:11 AM2016-03-29T00:11:10+5:302016-03-29T00:11:10+5:30
वाढत्या चोऱ्या व घरफोडीचे गुन्हे तत्काळ उघड करण्यासाठी आता पोलीस उपनिरीक्षकासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे
पोलीस आयुक्तांचा निर्णय : पीएसआयसह पाच कर्मचारी करणार तपास
अमरावती : वाढत्या चोऱ्या व घरफोडीचे गुन्हे तत्काळ उघड करण्यासाठी आता पोलीस उपनिरीक्षकासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी हा निर्णय घेतला असून प्रत्येक ठाण्यांतर्गत हे पथक केवळ चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करणार आहे.
मागील काही महिन्यांत शहरात मोठ्या प्रमाणात चोरी व घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र, त्या तुलनेत गुन्ह्यांच्या डिटेक्शनचे प्रमाण अत्यल्प आहे. शहरात ठिकठिकाणी पोलीस यंत्रणा सज्ज असतानाही दररोज दोन ते तीन चोऱ्या होत आहेत. या घटनांवर अंकुश लावण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याच्या पार्श्वभूमिवर लोकमतने ‘पोलीस सुस्त, चोरटे मस्त’ या मथळ्याखाली सोमवारी वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी पोलीस अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
पोलीस आयुक्तांनी चोरीच्या गुन्ह्यांवर अंकुश लावण्याकरिता स्वतंत्र पथकच तयार केले आहे. चोरीच्या गुन्ह्यांचे तपासकार्य, चोरट्यांकडे लक्ष ठेवणे व चोऱ्यांच्या डिटेक्शनचे काम पथकाकडे दिले आहे. तसेच शहर व तालुक्यात अटक झालेल्या चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्याच्या सूचनाही पोलिसांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मालमत्ताविषयक गुन्हे उघड करण्यासाठी हे पाऊल उचलले असून चोरट्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर पेशी केली जाणार आहे.
पोलीस निरीक्षकांना लेखी पत्र
शहरातील प्रत्येक ठाण्यांतर्गत चोरीच्या घटना घडत आहेत. पोलीस यंत्रणा सज्ज असतानाही तपास मंदावल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यांचा आढावा घेऊन कोणी किती कामे केलीत, याचे मूल्यमापन केले जाणार आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत दहाही पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना लेखी पत्र देऊन सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम जाणवणार, असे आयुुक्तांचे मत आहे.
डीबी पथकाचे होणार मूल्यमापन
शहरात पोलीस यंत्रणा सज्ज असतानाही विविध गुन्हे घडत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. प्रत्येक ठाण्यात एक डीबी पथक असतानाही गुन्हेगारी वाढतच आहे, त्यादृष्टीने डीबी पथकाच्या कामकाजाचे मुल्यमापन केले जाणार आहे.
वाढत्या चोऱ्या व घरफोडयांच्या तपासाकरिता पीएसआय व पाच कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. चोरीच्या गुन्ह्यांचा तपास, चोरट्यांवर लक्ष ठेवणे व गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी या पथकाकडे सोपविण्यात आली आहे.
- नितीन पवार,
पोलीस उपायुक्त.