अमरावती जिल्ह्यातील येवदा येथील पोलीस महिलेचा मृत्यू; कोरोना अहवाल प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 09:19 PM2020-04-03T21:19:01+5:302020-04-03T21:19:29+5:30
स्थानिक पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या ३० वर्षीय महिलेचा नागपूर येथे शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या ३० वर्षीय महिलेचा नागपूर येथे शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. महिला सात महिन्यांची गर्भवती होती. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असताना त्यांचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला होता. त्याबाबतचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.
पोलीस महिलेने ३० मार्च रोजी येवदा पोलीस ठाण्यात सेवा बजावली. ३१ मार्च रोजी त्यांची सुटी होती. १ एप्रिल रोजी गर्भारपणामुळे अस्वस्थ वाटल्याने त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने त्यांची प्राथमिक तपासणीही करण्यात आली. त्यांचा थ्रोट स्वॅब काढून तो नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला. दरम्यान, १ व २ एप्रिल रोजी इर्विनमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांना ३ एप्रिल रोजी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. दुपारी ४.१५ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, न्यूमोनिया झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिलेल्या कॉज आॅफ डेथमध्ये म्हटल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
१ एप्रिल रोजी त्या स्वत: इर्विनला गेल्या होत्या. त्याच दिवशी त्यांचा थ्रोट स्वॅब काढून तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्या गर्भार होत्या. त्यांचा मृत्यू न्यूमोनियाने झाल्याचे नागपूर जीएमसीमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
- बाळकृष्ण पावरा, ठाणेदार, येवदा