खासगी बससंदर्भात महिनाभरात धोरण
By admin | Published: May 31, 2014 11:08 PM2014-05-31T23:08:22+5:302014-05-31T23:08:22+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव (श्यामजीपंत) येथे गुरुवारी खासगी बस पेटल्याने बसमधील पाच प्रवाशांचा मृत्यू तर काही प्रवासी गंभीर जखमी झालेत. खासगी बसेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात कुठल्याही
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : लोकप्रतिनिधींनी मांडली भूमिका
अमरावती : राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव (श्यामजीपंत) येथे गुरुवारी खासगी बस पेटल्याने बसमधील पाच प्रवाशांचा मृत्यू तर काही प्रवासी गंभीर जखमी झालेत. खासगी बसेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात कुठल्याही उपाययोजना नाहीत. त्यामुळेच ही दुर्देवी घटना घडली आहे.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी खासगी बसेसबाबत प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत धोरण असावे, अशी मागणी आ. अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकार्यांनकडे केली होती. त्यानुसार शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व लोकप्रतिनिधी व खासगी बस मालक, तसेच संबंधित अधिकार्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालात घेण्यात आली. या बैठकीत खासगी बसेसमध्ये प्रवाशांची कशी गैरसोय होते आहे याचा पाढा खासदार आनंदराव अडसूळ, आमदार अनिल बोंडे, रवी राणा, वीरेंद्र जगताप, अभिजित अडसूळ, नितीन मोहोड यांनी वाचत प्रादेशिक परिवहन अधिकारी, एस. टी. महामंडळाचे अधिकार्याचा चांगलाच समाचार घेतला. खासगी बसेसमध्ये प्रवाशांना सुरक्षेसंदर्भात तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा दम भरला. दरम्यान याबाबत येत्या महिन्याभरात खासगी बसेसच्या प्रवाशांचा सुरक्षिततेबाबत धोरण ठरविण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी बैठकीत दिले.
खाजगी बसने अमरावतीतून दररोज हजारो प्रवासी पुणे, औरंगाबाद नाशिक व अन्य ठिकाणी शिक्षण, नोकरी, व्यवसाय व वैद्यकीय उपाचारासाठी प्रवास करतात. मात्र या खासगी बसेसमध्ये प्रवाशांना सुरक्षेसंदर्भात कुठल्याही उपाययोजना नाहीत. यावर संबंधित अधिकार्यांचाही अंकुश नाही. कधीही खासगी बसेसची तपासणी प्रादेशिक परिवहन विभागाद्वारा करण्यात येत नाही. नियमात बसत नसतानाही खासगी तसेच एसटी बसेसना फिटणेस प्रमाणपत्र देणार्या प्रादेशिक परिवहन अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या बैठकीत उपस्थितांनी केली. मृत प्रवाशांना प्रत्येकी १0 लक्ष रुपयांची मदत देण्यात यावी, खासगी प्रवासी बसची सुरक्षा व प्रवासी भाड्यावर नियंत्रण करण्याकरिता शासनाने कठोर कायदा करावा, लांब पल्ल्याच्या खासगी बसेससाठी निश्चित बस थांबे देण्यात यावेत. जखमी प्रवाशांना ५ लक्ष रुपयांची मदत द्यावी आदी सूचना या बैठकीत लोकप्रतिनिधींनी केल्यात. बैठकीत इतरही विविध मुद्दावरीही वादळी चर्चा झाली.
बैठकीमध्ये खासगी बस असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी आपली बाजू मांडली. परंतु ठोस काही तोडगा निघाला नाही. यावेळी, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार अनिल बोंडे, रवी राणा, वीरेंद्र जगताप, अभिजित अडसूळ, नितीन मोहोड शेषराव खाडे, खासगी बसेस असोऐशिनचे अध्यक्ष मेराज खान पठाण, नीळकंठ मुरुमकर, अजिज पटेल, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल प्रादेशिक परिवहन अधिकारी वाडेकर, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, एसटी महामंडळाचे अधिकारी एम.के. महाजन, राजेश अडोकार, जिल्हा शल्यचिकित्सक रघुनाथ भोये, मनपा उपायुक्त रमेश मवासी, नितीन मोहोड, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)