पती-पत्नीच्या भांडणात राजकीय रंग
By admin | Published: January 14, 2016 12:19 AM2016-01-14T00:19:08+5:302016-01-14T00:19:08+5:30
येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभीवाघोली येथे अवैध दारु विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेचा पतीसोबत कडाक्याचे भांडण झाले.
कुंभी वाघोलीचे प्रकरण संशयास्पद : बयानात तफावत
पथ्रोट : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभीवाघोली येथे अवैध दारु विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेचा पतीसोबत कडाक्याचे भांडण झाले. परंतु या भांडणाला राजकीय रंग दिल्याने पोलिसांविरुद्ध तक्रार झाल्याने संपूर्ण प्रकरणच संशयास्पद ठरले.
कुंभी वाघोली येथे वास्तव्यास असणारे पती-पत्नीची पूर्ण पार्श्वभूमी ही अपराधिक स्वरुपाची आहे. याची कल्पना सर्वदूरपर्यंत पसरलेली आहे. ही महिला सात वर्षा अगोदर वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वायगाव येथे मजुरीसाठी गेली होती. त्याठिकाणी तिने स्वत:वर बलात्कार झाल्याची तक्रार देऊन प्रकरण अंगलट येताच बयाण बदलविलेले होते. त्यानंतर चार वर्षापूर्वी पती-पत्नीच्या भांडणात तिला पतीने जबर मारहाण करुन पेटवून दिले होते. त्यात ती पंचवीस टक्के जळाली.
१० जानेवारी रोजी ११.३० वाजता तिने पोलिसांनी मारहाण करुन जाळण्याचा प्रयत्न केला असल्याबाबतची तक्रा पोलीस ठाण्यात दिली. संध्याकाळी साडेसहा वाजता सदरची घटना घडली असताना रात्री ११.३० पर्यंत पोलिसांना माहिती न देणे, दरम्यान तालुक्यावरुन राजकीय संघटनेचे पदाधिकाऱ्यांना बोलविणे, थेट पोलिसांवर आरोप लावणे असा प्रकार घडल्याने गावकऱ्यांच्या आणि पिडीत महिलेच्या बयाणाबाबत माहिती घेतली असता त्यांच्यात प्रचंड तफावत आढळून आली. ही महिला अवैध दारुचा व्यवसाय करीत असल्याने पोलिसांनी तिच्यावर वारंवार कारवाई करुन तिला व्यवसाय न करण्यास बजाविले होते. या त्रासाला कंटाळून तिने त्या पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध लेखी तक्रार पोलीस ठाण्यात दिली. परंतु घडलेल्या प्रकरणाने पोलिसांसह संपूर्ण गावच अवाक झाले.
१० जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता ती घरात स्वयंपाक करीत असताना एक पोलीस व त्याच्या सोबत दोन अनोळखी तोंडाला रुमाल बांधून घरात शिरले. त्यावेळी घरात मी एकटीच होती. तेव्हा तू दारु विकते, आम्ही जप्त करण्यास आलो. तू वाईट काम करते, असे सांगून मला मारहाण करीत घरातील सामानांची फेकफाक केली. दारु न मिळाल्याने संतापून त्यांनी रॉकेल ओतून मला जाळण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांच्या जवळून रॉकेलची डबकी व माचीस हिसकावली तेव्हा ते पळून गेले. त्यानंतर माझे पती घरी आल्यावर त्यांनी मी हकीकत सांगितली.
एवढा भयंकर प्रकार घडल्यावर चार ते पाच तासापर्यंत पोलीस स्टेशनला तक्रार न देणे, राजकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पोलिसांना माहिती कळविणे त्यामुळे हा संपूर्ण प्रकारच संशयास्पद ठरला आहे. (वार्ताहर)