बच्चू कडू, रवी राणा यांच्यात शाब्दिक ‘वॉर’, एकमेकांवर चिखलफेक; राजकीय स्पर्धा टोकाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2022 03:24 PM2022-08-29T15:24:33+5:302022-08-29T15:33:02+5:30
सध्याचे राजकारण गढूळ होत चालल्याने जशास तशे उत्तर देण्याची जणू फॅशन सुरू झाली असल्याचे एकूणच चित्र आहे.
अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे खंदे समर्थक असलेले बच्चू कडू आणि रवी राणा या आमदारद्वयांमध्ये गत आठवड्यात एकमेकांविरुद्ध राजकीय शाब्दिक ‘वॉर’ सुरू झाले. ‘मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही’ अशी बोचरी टीका आमदार रवी राणा यांनी कडूंवर केली, तर आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर तुम्ही मंत्रिपदासाठी रांगेत नसता, असा पलटवार करीत बच्चू कडू यांनी ‘आम्ही नाचणारे नाही, तर नाचवणारे आहोत’, असे म्हणत राणांचा खरपूस समाचार घेतला. राज्याच्या नव्या सरकारमध्ये कडू आणि राणा हे दोघेही मंत्रिपदाच्या शर्यतीत असताना दहीहंडी उत्सवात अचानक या दोघांमध्ये उफाळून आलेली राजकीय स्पर्धा टोकाला गेली.
२१ ऑगस्ट रोजी येथील नवाथे चौकात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अभिनेता गोविंदा, खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीत विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धा पार पडली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दडीहंडी उत्सवात अमरावती लोकसभा आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघातून यापुढे ‘कमळ’ फुलेल, असे म्हणताना राणा दाम्पत्याची वाटचाल भाजपच्या दिशेने सुरू असल्याचे संकेत दिले. यामुळे बावनकुळे यांच्या सूचक विधानाने आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा हे दोघेही भाजपत जाणार का, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
...सबसे बडा रुपय्या : रवी राणा
युवा स्वाभिमानच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी येथील नवाथे चौकात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अभिनेता गोविंदा, खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीत विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धा पार पडली. यावेळी आमदार रवि राणा यांनी जोशपूर्ण आणि तडाखेबाज भाषण देताना आमदार बच्चू कडू यांचा नामोल्लेख टाळून त्यांना ‘टार्गेट’ केले. ‘सगळ्यांना माहीत आहे, मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. मी देवेंद्र फडणवीसांचा सच्चा शिपाई, मित्र आहे. मला गर्व आहे, महाराष्ट्राचा नेता विदर्भाचा आहे. फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रसमान विदर्भाचा विकास केला. म्हणून मी फडणवीस यांच्यासोबत आहे. ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपय्या, अशी काहींची शैली आहे. पण, मी त्यापैकी नाही, असे म्हणत आमदार राणांनी बच्चृू कडू यांना चांगलेच डिवचले. कडू यांच्या मतदारसंघात जाऊन आ. राणांनी टीका केली.
.. तर मंत्रिपदाच्या रांगेत नसता : बच्चू कडू
‘प्रहार’ संघटनेच्या वतीने चांदूर बाजार येथे गत आठवड्यात आयोजित दहीहंडी स्पर्धेत आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवि राणा यांच्यावर जोरदार ‘प्रहार’ केला. मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही, असे म्हणायचे आणि मंत्रिपदासाठी रांगेत उभे राहायचे कशासाठी, अशी टीका कडूंनी केली. आम्ही आमदार शिंदेंसोबत गुवाहाटी गेलो नसतो, तर तुला मंत्रिपदाच्या रांगेत उभे राहण्याची संधी मिळाली नसती हे विसरू नये, असे आमदार बच्चू कडू म्हणाले. गुवाहाटी हा शब्द जिव्हारी लागल्याने आमदार बच्चू कडू यांची जीभ घसरली. आमदार रवी राणा यांच्यावर शरसंधान साधताना काही शब्द असंसदीय वापरण्यात आले, आरोप प्रत्यारोप करताना संसदीय भाषेचा वापर व्हावा, असे लोकशाहीत अपेक्षित आहे. मात्र, सध्याचे राजकारण गढूळ होत चालल्याने जशास तशे उत्तर देण्याची जणू फॅशन सुरू झाली असल्याचे एकूणच चित्र आहे.