जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 17 संचालकांसाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 05:00 AM2021-10-04T05:00:00+5:302021-10-04T05:00:55+5:30
जिल्हा उपनिबंधकांच्या नियंत्रणात ही निवडणूक प्रक्रिया पूर्णत्वास आणण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात १४ ठिकाणी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मतदान करता येणार आहे. १७ संचालक पदांसाठी ४८ उमेदवार रिंगणात आहेत. सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनल अशी थेट लढत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १७ संचालकपदांच्या निवडीसाठी सोमवार, ४ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जिल्हा बँकेत २१ संचालक असून, अगोदर चार संचालक बिनविरोध निवडून आले आहेत, हे विशेष.
जिल्हा उपनिबंधकांच्या नियंत्रणात ही निवडणूक प्रक्रिया पूर्णत्वास आणण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात १४ ठिकाणी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मतदान करता येणार आहे. १७ संचालक पदांसाठी ४८ उमेदवार रिंगणात आहेत. सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनल अशी थेट लढत आहे. सहकार क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेले काही उमेदवार अपक्ष म्हणून शड्डू ठोकून आहेत. त्यामुळे तालुका सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत मतदारांनी काही चमत्कार केल्यास आश्चर्य वाटू नये, अशी जोरदार चर्चा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला रंगली आहे. ५ ऑक्टोबर रोजी मतमाेजणी होणार आहे.
आठ टेबलवरून ही मतमोजणी होणार आहे. यासाठीचे नियोजन बँकेच्या निवडणूक विभागाद्वारा करण्यात आल्याची माहिती आहे.
दिग्गजांच्या लढतीकडे लक्ष
चांदूर बाजार तालुक्यातून ना. बच्चू कडूविरुद्ध काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, दर्यापुरातून आमदार प्रकाश भारसाकळेविरुद्ध सुधाकर भारसाकळे, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातून आ.बळवंत वानखडेविरुद्ध आमदार राजकुमार पटेल व ओबीसी प्रवर्गातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख विरुद्ध राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांच्यात थेट लढत होत आहे. महिला मतदारसंघातून सुरेखा ठाकरे, निवेदिता चौधरी, मोनिका वानखडे, माया हिवसे, जयश्री देशमुख, वैशाली राणेंची उमेदवारी लक्षवेधक ठरत आहे
सेवा सहकारी सोसायटीच्या मतदारांसाठी पांढरी मतपत्रिका
१४ पैकी चार सेवा सहकारी सोसायटीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. आता १० संचालक पदांसाठी निवडणूक होत आहे. सेवा सहकारी सोसायटीच्या मतदारांसाठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका असतील. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून अभिजित ढेपे, तिवसा सुरेश साबळे, वरूड तालुक्यातून नरेशचंद्र ठाकरे, धारणीतून जयप्रकाश पटेल हे चार संचालक बिनविरोध घोषित झाले. अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी फिक्कट निळी, व्हीजेएनटीसाठी पिवळी, महिला राखीव मतदारांसाठी गुलाबी, ओबीसी मतदारांसाठी फिक्कट हिरवी, ‘क’ निर्वाचन क्षेत्रासाठी केसरी, ‘क’ निर्वाचनसाठी पाेपटी मतपत्रिका.
मतदान केंद्रे
अमरावतीत जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूल, दर्यापुरात जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, अचलपुरात जिल्हा परिषद माध्यमिक शाळा,
चांदूर रेल्वे येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, अंजनगाव सुर्जी येथील राधाबाई सारडा महाविद्यालय, धामणगाव रेल्वे येथील हिराबाई गोयनका कन्या विद्यालय, नांदगाव खंडेश्वर येथील राजाभाऊ देशमुख महाविद्यालय, चांदूर बाजार येथील जिजामाता विद्यालय, चिखलदरा येथील गिरी सहकारी संस्था, वरूड येथील ऑरेंज सिटी कॉन्व्हेंट, मोर्शी येथील भारती महाविद्यालयात मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.