सिंचन प्रकल्पांकरिता प्रदूषण नियंत्रण मंडळाला हवी नऊ कोटींची बँक गॅरंटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 03:29 PM2019-05-14T15:29:02+5:302019-05-14T15:31:32+5:30
पर्यावरणविषयक मंजुरीत अडकलेल्या वासनी, गर्गा आणि बोर्डी नाला प्रकल्पांना आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास नऊ कोटींची बँक गॅरंटी द्यावी लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अनिल कडू
अमरावती : पर्यावरणविषयक मंजुरीत अडकलेल्या वासनी, गर्गा आणि बोर्डी नाला प्रकल्पांना आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास नऊ कोटींची बँक गॅरंटी द्यावी लागणार आहे. ही बँक गॅरंटी दिल्यानंतरच जलसंपदा विभागास या तिन्ही प्रकल्पांचे काम सुरू करता येणार आहे. पर्यावरणविषयक मंजुरीअभावी या प्रकल्पांचे काम तीन वर्षांपासून बंद पडले आहे.
अचलपूर तालुक्यातील वासनी मध्यम प्रकल्पासाठी ३.७५ कोटी, धारणी तालुक्यातील गर्गा प्रकल्पास २.४७ कोटी, तर चांदूर बाजार तालुक्यातील बोर्डी नाला प्रकल्पास २.५७ कोटींची बँक गॅरंटी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे भरावयाची आहे. पर्यावरण (एसईआयएए) समितीने या तिन्ही प्रकल्पांना २५ जानेवारी २०१९ रोजीच्या पत्रानुसार पर्यावरणविषयक मान्यता दिली. मात्र, ती मान्यता देताना त्यांनी बँक गॅरंटीची अट घातली आहे. रकमेचा भरणा केला नसल्याने तालुक्यातील हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडले आहेत.
यासाठी हवी बँक गॅरंटी
प्रकल्प बांधकामामुळे होत असलेले प्रदूषण व पर्यावरणविषयक नुकसान भरून काढण्याकरीता प्रत्येक प्रकल्पस्थळी नऊ प्रजातींची झाडे लावून पुढील तीन वर्षे त्यांचे संगोपन करण्याची, त्यांना जगवून मोठे करण्याची जबाबदारी या प्रकल्पांवर टाकण्यात आली आहे. यात कडुनिंबाच्या झाडांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासोबतच कांचन (आपटा), शिसव (शिसम), शिरस, बाभूळ, धरंग, चिंच, ग्लिरिसिडिया, कॅसिया आदी नऊ प्रजातीची झाडे प्रकल्पस्थळी व परिसरात प्रकल्प यंत्रणेला लावावी लागणार आहेत. त्यापोटी ही बँक गॅरंटी घेतली जात आहे.
खातरजमा झाल्यानंतर परत
लावलेल्या झाडांची तपासणी व प्रत्यक्ष पाहणी तीन वर्षानंतर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाद्वारे केली जाणार आहे. निर्धारित संख्येनुसार संबंधित प्रजातींची झाडे मोठी होऊन जिवंत आढळून आल्यास सिंचन मंडळाकडून घेतलेली बँक गॅरंटी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सिंचन मंडळास परत करणार आहे. अचलपूर तालुक्यातील वासनी मध्यम प्रकल्पस्थळी ८९१ झाडे तोडली जातील. या ८९१ झाडांच्या बदल्यात २५ हजार झाडे प्रकल्प यंत्रणेला लावावी लागणार आहेत. यात कडुनिंबांची नऊ हजार, तर उर्वरित आठ प्रजातींच्या प्रत्येकी दोन हजार झाडांचा समावेश आहे.
धारणीतही होणार वृक्षारोपण
धारणी तालुक्यातील गर्गा मध्यम प्रकल्पावर १ हजार ९३ झाडे तोडली जाणार असून, या झाडांच्या बदल्यात प्रकल्प यंत्रणेला ४ हजार ५०० झाडे लावावी लागणार आहेत. यात झाडांच्या नऊ प्रजातींच्या प्रत्येकी ५०० झाडांचा समावेश आहे. चांदूर बाजार तालुक्यातील बोडीर् नाला प्रकल्पावर एकूण पाच हजार झाडे प्रकल्प यंत्रणेला लावावी लागणार आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास बँक गॅरंटी दिल्यानंतरच प्रकल्पाचे काम सुरू करता येणार आहे. वासनी आणि गर्गा प्रकल्पाच्या बँक गॅरंटीकरिता ६ कोटी २८ लाख ७६ हजार रुपये निधी आवश्यक आहे. बँक गॅरंटी लवकरच दिली जाणार आहे.
- उ.ज. क्षीरसागर, कार्यकारी अभियंता, अमरावती