प्रदूषण नियंत्रण मंडळाची रतन इंडियात धाव
By admin | Published: April 1, 2016 12:18 AM2016-04-01T00:18:56+5:302016-04-01T00:18:56+5:30
वाघोली येथील पेयजल पिण्यास अयोग्य असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या वृत्ताची दखल घेत प्रदुषण नियंत्रण मंडळाने रतन इंडियात धाव घेतली.
पाणी तपासले : नमुने प्रयोगशाळेत, लवकरच अहवाल
अमरावती : वाघोली येथील पेयजल पिण्यास अयोग्य असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या वृत्ताची दखल घेत प्रदुषण नियंत्रण मंडळाने रतन इंडियात धाव घेतली. प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी ए.जे. कुडे यांच्या नेतृत्वात मनोज वाटाणे आणि जितेंद्र पुरके यांनी २९ मार्चला रतन इंडियामधील परिसरात प्रदुषण विषयक तपासणी केली.
वाघोली ग्रामपंचायतजवळील स्टॅन्ड पोस्टमधून घेतलेला पाण्याच्या नमुना प्रयोगशाळेने पिण्यासाठी अयोग्य ठरविला, असे वृत्त ‘सोफियामुळे पेयजल बाधीत’ या शिर्षकाखाली ‘लोकमत’ने २९ मार्चला प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची तत्काळ दखल घेण्यात आली तथा कोलयार्ड, रेल्वेपरिसर व अन्य ठिकाणच्या जलस्त्रोतातील पाण्याचे नमुने घेण्यात आले. रतन इंडियाच्या सोफिया औष्णिक विद्युत प्रकल्पातून निघणारे पाणी पेयजलाच्या स्त्रोतामध्ये मिसळून वाघोलीसह नजीकच्या अन्य गावामधील पेजयल पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल जिल्हा प्रयोग शाळेने दिला होता. त्या अनुषंगाने येथील ग्रामस्थही पेयजलातून उद्भवणाऱ्या आरोग्याच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अमरावती प्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी रतन इंडिया प्रकल्प परिसरासह अन्य ठिकाणचे पाणी नमुने घेतले व ३० मार्चला तपासणीसाठी पाठविले आहेत. याबाबत अहवाल अद्याप अप्राप्त असताना पाण्यातील पीएच हा घटक योग्य प्रमाणात आढळून आल्याचा दावा रतन इंडियाकडून करण्यात आला आहे. हा दावा प्रदुषण नियंत्रण मंडळाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.