पॉलिमर जेलमुळे वाढणार रिचार्जेबल बॅटरीची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:16 AM2021-09-06T04:16:49+5:302021-09-06T04:16:49+5:30

(फोटो ०५ एएमपीएच०२,०३) अमरावती : वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या ई-व्हेईकलकडे वळल्या असल्या तरी दीर्घकाळ चालणारी व दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या ...

Polymer gel will increase the capacity of rechargeable batteries | पॉलिमर जेलमुळे वाढणार रिचार्जेबल बॅटरीची क्षमता

पॉलिमर जेलमुळे वाढणार रिचार्जेबल बॅटरीची क्षमता

Next

(फोटो ०५ एएमपीएच०२,०३)

अमरावती : वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या ई-व्हेईकलकडे वळल्या असल्या तरी दीर्घकाळ चालणारी व दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या बॅटरीबाबत संशोधन सुरूच आहे. अमरावती येथील डॉ. विजया संगावार यांनी रिचार्जेबल बॅटरीत पॉलिमर जेलचा वापर करून बॅटरीचे आयुर्मान किमान नऊ वर्षे वाढविण्याचे आगळेवेगळे संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनास केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे. वाहन उद्योगक्षेत्रासाठी नव्या संधीचे दालन यामुळे उघडले आहे.

अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेतील भौतिकशास्त्र विषयाच्या प्राध्यापक डॉ. विजया संगावार यांनी ‘ रोडामीन डाय डोप्ड पॉलिव्हिनिल अल्काहोल, पोटॅशियम थिओसायनेट रिव्हर्सिबल, सस्टेनेबल पॉलिमार जेल इलेक्ट्रोलाईट ॲन्ड प्रोसेस ऑफ सिथेंसिस’ या संशोधनास पेटेंट प्रदान करण्यात आले आहे. यात डाॅ. संगावार यांना शीतल भड, राेशनी भगत या संशोधक विद्यार्थ्यांचे सहकार्य मिळाले. हे पेटेंट ६ मार्च २०१९ रोजी केंद्र सरकारकडे फाईल करण्यात आले होते. २४ ऑगस्ट २०२१ रोजी या पेटेंटला मान्यता मिळाली आहे.

----------------

नऊ वर्षांपर्यंत पॉलिमर जेल ‘जैसे थे’

रोडामीन डाय व पोटॅशियम थिओसायनेचा योग्य प्रमाणात पाॅलिव्हिनिल अल्कोहोल या पॉलिमरमध्ये वापर करून अतिशय सोप्या व कमी खर्चाच्या पद्धतीने जेल बनविण्यात आले. या जेलचा मुख्यत: इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचा अभ्यास करून सुमारे नऊ वर्षे जतन करून ठेवले. त्यानंतर त्याच्या पुन्हा चाचण्या केल्या असता तो ‘जैसे थे’ आढळून आला आणि जेलची कंडक्टिव्हिटी कायम होती. हा जेल साध्या पद्धतीेने पूर्ववत वापरता येतो, हे संशाेधनाअंती सिद्ध झाल्यानंतर २०१९ मध्ये या संशोधनावर केंद्र सरकारकडे पेटेंट फाईल करण्यात आली. हा जेल पूर्वस्थितीत परत आणणे सोपे असून, या जेलमध्ये नऊ वर्षे टिकून राहण्याची

क्षमता आहे.

--------------------

केंद्र सरकारकडून आतापर्यंत तीन संशोधनास मान्यता मिळाली आहे. पॉलिमर जेलमुळे रिचार्जेबल बॅटरीची क्षमता वाढेल. या जेलचा वापर उपयुक्त व प्रभावी ठरेल. यापूर्वी १३ विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी गाईड केले आहे. पेटेंट कार्याची केंद्रीय शिक्षण मंत्री, राज्यपाल, उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी दखल घेत प्रशस्तीपत्राने सन्मानित केले आहे.

- डॉ. विजया संगावार, अमरावती.

Web Title: Polymer gel will increase the capacity of rechargeable batteries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.