महामार्गाच्या नालीच्या पाण्याने शेतांचे झाले तळे
By admin | Published: June 22, 2015 12:10 AM2015-06-22T00:10:19+5:302015-06-22T00:10:19+5:30
जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. महामार्गावरील पावसाचे पाणी निघून जाण्यासाठी दुतर्फा मातीच्या नाल्या काढल्या आहेत.
नाल्यात सोडावे पाणी : पेरणी कशी करावी? शेतकरी चिंतेत
अमरावती : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. महामार्गावरील पावसाचे पाणी निघून जाण्यासाठी दुतर्फा मातीच्या नाल्या काढल्या आहेत. परंतु त्या सदोष आहेत, त्यांची टोके नालीत काढण्यात आलेली नाही. त्यामुळे नालीचे पाणी घुसून रातोरात शेताचे तळे होत असल्याने शेतात पेरणी कशी करावी, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
अमरावती-तिवसा दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. महामार्गावर पडणारे पाणी निघून जाण्यासाठी नाल्या खोदण्यात आल्या आहेत. याच नाल्यालगत पुन्हा केबल टाकण्यासाठी खोदण्यात आल्यामुळे नाल्या बुजल्या आहे व पावसाचे पाणी सरळ लगतच्या शेतात शिरत आहे.
शिवणगाव ते तिवसादरम्यान पहिल्याच पावसात अनेक शेतात पाणी शिरले असल्याने शेतात तळे साचले आहे. अशीच स्थिती राहिल्यास शेतात पिके घेणे कठीण होणार आहे. मुळात महामार्गाच्या दुतर्फा केबलसाठी नाल्या खोदल्या असताना पाणी काढणाऱ्या नाल्या बुजल्या जाणार नाही याची काळजी महामार्ग विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नसल्याने शेतकऱ्यांवर बिकट प्रसंग ओढावला आहे. किंबहुना महामार्गाची देखभाल दुरूस्ती करणाऱ्या आयआरबी कंपनीने देखील केबलसाठी नाल्या खोदल्या जात असताना दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर सध्या ओढवलेल्या बिकट प्रसंगासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबतच आयआरबी कंपनी व केबलसाठी नाल्या खोदणारे कंत्राटदार तेवढेच जबाबदार असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)