धारणीत स्वच्छतागृहांची शोचनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:13 AM2021-03-23T04:13:34+5:302021-03-23T04:13:34+5:30
पाण्याची सुविधा नाही, स्वच्छता रामभरोसे, तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य धारणी : स्थानिक तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या चेंबरलगत नवीन संडास बांधकामाचे ...
पाण्याची सुविधा नाही, स्वच्छता रामभरोसे, तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य
धारणी : स्थानिक तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या चेंबरलगत नवीन संडास बांधकामाचे प्रकरण गाजत असतानाच, विनावापराच्या स्वच्छतागृहाची दुरवस्थाही पुढे आली आहे. तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य पसरले असून, सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे.
सदर प्रतिनिधीने पाहणी केली असता, तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहांची गेल्या अनेक वर्षांपासून साफसफाई न झाल्यामुळे ती घाणीच्या विळख्यात सापडले असल्याचे दिसून आले. तहसील कार्यालयाच्या पश्चिमेकडे सेतु केंद्राला लागून महिला व पुरुषांसाठी वेगवेगळी स्वच्छतागृहे बांधण्यात आली. परंतु, या स्वच्छतागृहांमध्ये पाणी नसल्यामुळे तसेच स्वच्छता कर्मचारी नसल्याने या स्वच्छतागृहांची दुरवस्था झालेली आहे .
तहसील कार्यालयात जवळपास १७० गावांतील महिला, पुरुष आपली शासकीय कामे करण्यासाठी दररोज शेकडोंच्या संख्येने हजेरी लावतात. त्यांना अनेक वेळा दिवसभर ताटकळत बसावे लागते. अशातच लघुशंका व शौचासाठी कार्यालयातील शौचालयगृहे अस्वच्छतेमुळे वापरता येणे शक्य होत नाही. त्यामुळे तहसील कार्यालयात तहसीलदारांसाठी निर्माण करण्यात आलेल्या स्वच्छतागृहासोबत सर्वसामान्यांसाठी बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाची अवस्थासुद्धा वापरायोग्य व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.