वाठोडा शुक्लेश्वर येथील अंगणवाडीतील बालकांना निकृष्ट दर्जाचा आहार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:10 AM2021-06-24T04:10:53+5:302021-06-24T04:10:53+5:30
आहारातील मूगडाळ अत्यंत निकृष्ट दर्जाची असून, बालकांना अजिबात खाण्यायोग्य नाही. ही मूगडाळ आहे की, कोणती डाळ, हे ओळखणे दुरापास्त ...
आहारातील मूगडाळ अत्यंत निकृष्ट दर्जाची असून, बालकांना अजिबात खाण्यायोग्य नाही. ही मूगडाळ आहे की, कोणती डाळ, हे ओळखणे दुरापास्त आहे. हा प्रकार जिल्ह्यातील संबंधित विभागातील अधिकारी पोट भरण्यासाठी करत असल्याचा आरोप पालकवर्गांनी केला आहे. हे निष्कृष्ट साहित्य संबंधित अधिकारी-कर्मचारी आपल्या मुलांच्या जेवणात देतील का, हा प्रश्न पालक विचारत आहे. या आहारात बालक सुदृढ तर सोडा, परंतु कुपोषित होण्याची शक्यता अधिक आहे. या विभागाच्या मंत्री अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री असल्याने यशोमती ठाकूर यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे परिसरातील पालकांकडून बोलले जात आहे.
गरोदर माता आणि तीन वर्षांपर्यंतची बालके यांचे मुळातच रोगप्रतिकारशक्ती कमी असते. अशा स्थितीत त्यांना पौष्टिक आहार मिळणे गरजेचे असते. शासनाकडून कुपोषणमुक्तीसाठी पोषण आहार वाटप मोहीम हाती घेतली आहे. परंतु अशा पद्धतीचा निकृष्ट आहार बालकांच्या अथवा गरोदर मातांच्या पोटात गेल्यास त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अशा बाबींकडे गांभीर्याने लक्षात देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.