अभ्यासाविना गेले गरीब विद्यार्थ्याचे वर्ष; यावर्षीही परिस्थिती तशीच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:10 AM2021-06-11T04:10:18+5:302021-06-11T04:10:18+5:30
अमरावती : कोरोना संकटामुळे गत वर्षीपासून शाळा बंद आहे. त्यामुळे आरटीई अंतर्गत गतवर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष घरातच ...
अमरावती : कोरोना संकटामुळे गत वर्षीपासून शाळा बंद आहे. त्यामुळे आरटीई अंतर्गत गतवर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष घरातच आणि ऑनलाईन शिक्षणाविना गेले. कोरोना विषाणूचा वाढत्या संसर्गामुळे गतवर्षीपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. यातही ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्राॅईड मोबाईल नाही, अशा गरीब विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. सोबतच मेळघाटसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांकडे तर ऑनलाईन शिक्षणासाठी कुणाकडे मोबाईल नाही. कुणाकडे मोबाईल असला नेटवर्क कनेक्टिव्हिटीची अडचणी आल्यात. त्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेश झालेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांचे वर्ष अभ्यासाविनाच गेले. यंदाही परिस्थिती तशीच आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई्) देण्यात येणाऱ्या २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रियेसाठी गत काही वर्षांपासून या प्रवेशास पात्र पाल्याच्या पालकांचा ओढा वाढला आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेमुळे अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना राखीव जागांवर शासनाकडून प्रवेश दिले जातात. यानुसार सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्रासाठी यंदा जिल्ह्यात २४४ शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. यात २०७६ जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याकरिता जिल्हाभरातून ५ हजार ९१८ पालकांनी आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. या अर्जातून गत एप्रिल महिन्यात प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यस्तरावर सोडत काढण्यात आली. यात १९८० पाल्य प्रवेशास पात्र ठरले आहेत. यानुसार आता शुक्रवार ११ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, सध्या कोरोनाची स्थिती अजूनही कायम असल्याने गतवर्षीप्रमाणे यंदाही शाळा सुरू होणार की, नाही याबाबत संभ्रम आहे. अशातच शिक्षण ऑनलाईन की, ऑफलाईन याबाबतही चित्र अस्पष्ट आहे. जर ऑनलाईन शिक्षण सुरू राहिले तर गतवर्षीसारखीच यंदाही स्थिती कायम राहणार की, काय असा प्रश्न भेडसावत आहे.
बॉक्स
आरटीईसाठी नोंदणी झालेल्या शाळा -२४४
उपलब्ध जागा -२०७६
प्रवेशासाठीचे प्राप्त अर्ज ५९१८
सोडतीत प्रवेशास पात्र ठरलेले विद्यार्थ्यी -१९८०
कोट
गतवर्ष वाया गेले !
कोरोना संकटामुळे गेल्या वर्षी शाळा बंद होत्या. आजही शाळा बंदच आहेत. परिणामी शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली असली तरी मोलमजुरी करून मुलाला मोबाईल नसल्याने शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे अभ्यासाविनाच वर्ष गेले.
- जयकृष्ण सहारे,
पालक
कोट
आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केला. मात्र, प्रवेशही घेतले. अशातच कोरोनामुळे शाळा बंद, शिक्षण ऑनलाईन अशी स्थिती होती. असे असले तरी शाळेतील प्रत्यक्ष हजर राहून शिक्षण घेणे व घरीच राहून शिक्षण घेणे यात बराच फरक पडतो.
- प्रदीप माकोडे,
पालक
कोट
काेरोना संकटामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला.अशातच रोजगार मिळाला तर मिळणाऱ्या मोबदल्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा की, मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घ्यावा, हाच प्रश्न सतावत आहे.
- विलास रेहपांडे,
पालक
कोट
कोरोना संकटामुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाची सोय शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. गावस्तरावर शिक्षक मित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. आगामी शैक्षणिक सत्रात शाळा सुरू होणार काय, याबाबत कुठल्याही सूचना नाहीत.
- ई.झेड.खान,
शिक्षणाधिकारी प्राथमिक
बॉक्स
आरटीई प्रवेशप्रक्रिये अंतर्गत कागदपत्र जुळविण्यात पालकांनी दमछाक
कोरोनामुळे शाळा बंद आहेत. परिणामी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली असली तरी यासाठी लागणारे साहित्य गोरगरीब पालकांना आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने कठीण होत आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी गोरगरीब पाल्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते प्रमोद रोकडे यांनी व्यक्त केले.