अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकांवर कुलींचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 10:54 PM2018-02-28T22:54:01+5:302018-02-28T22:54:01+5:30
अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकांवर कार्यरत कुलींनी विविध मागण्यांसाठी देशपातळीवरील आवाहनानुसार बुधवार, २८ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय काम बंद आंदोलन केले.
बडनेरा : अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकांवर कार्यरत कुलींनी विविध मागण्यांसाठी देशपातळीवरील आवाहनानुसार बुधवार, २८ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय काम बंद आंदोलन केले. लायसन्सधारी कुलींना चतुर्थश्रेणीत समाविष्ट करावे, अशी त्यांची मुख्य मागणी होती.
रेल्वेमंत्र्यांनी यापूर्वी देशभरातील सर्वच लायसन्सधारी कुलींना चतुर्थश्रेणी दर्जा दिला होता. त्यापैकी १८ ते ५० वयोगटातील कुलींना रेल्वेत गँगमन म्हणून कार्यरत केले. मात्र, ५० वर्षांवरील ‘मेडिकली अनफिट’ कुलींना अपात्र ठरविण्यात आले. सध्या अनेक वर्षांपासून प्रत्येक रेल्वे स्थानकावर कुलीचे काम करणाºयांवर उपजीविकेसाठी खर्चदेखील निघत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून कार्यरत लायसन्सधारी कुलींना चतुर्थश्रेणीत समाविष्ट करावे, या मागणीसाठी आंदोलन असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आंदोलनादरम्यान मात्र अपंग, आजारी, वयोवृद्धांचे सामान वाहून नेण्याचे काम केले.