गरिबांसमोर झुकेन, मंत्र्यासमोर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:31 PM2019-01-14T23:31:30+5:302019-01-14T23:32:11+5:30

गोरगरिबांसमोर मी शंभर वेळा झुकेन; पण कुणी फुकटछाप भाषण देऊन जात असेल, तर अशा कुठल्याही मंत्र्या-संत्र्यांना मी मोजत नाही, अशी टीका आ. रवि राणा यांनी नाव न घेता अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यावर केली. सायन्स कोअर येथे महिला मेळाव्यात ते बोलत होते.

Poorly in front of the poor, not in front of the minister | गरिबांसमोर झुकेन, मंत्र्यासमोर नाही

गरिबांसमोर झुकेन, मंत्र्यासमोर नाही

Next
ठळक मुद्देराणा यांचा पोटेंवर निशाणा : खासदाराला १७०० पैकी १७ गावांचीही ओळख नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गोरगरिबांसमोर मी शंभर वेळा झुकेन; पण कुणी फुकटछाप भाषण देऊन जात असेल, तर अशा कुठल्याही मंत्र्या-संत्र्यांना मी मोजत नाही, अशी टीका आ. रवि राणा यांनी नाव न घेता अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यावर केली. सायन्स कोअर येथे महिला मेळाव्यात ते बोलत होते.
परवा येथे कुणी मंत्री आले. त्यांना अनेकांनी बालकमंत्री संबोधले. भाषण देताना त्यांच्या अंगातून घाम निघत होता. त्यांना नेमके कुठले आजार आहेत, हे माहीत नाही. त्यामुळे व्यासपीठावरच काही होऊ नये म्हणून माणुसकीच्या नात्याने त्यांना मी पाणी दिले. त्या कार्यक्रमात आम्ही दिवसभर जनतेचे प्रश्न सोडविले; ते मात्र भाषण देऊन निघून गेले, असा टोलाही यावेळी आ. राणा यांनी लगावला.
यावेळी राणा यांनी खा. आनंदराव अडसुळांवरही चांगलेच तोंडसुख घेतले. या जिल्ह्याच्या खासदाराला १७०० गावांपैकी ७० गावांचीही ओळख नाही, अशी टीका त्यांनी केली. पीआर कार्डसंदर्भाचा निर्णय करून आणला आहे. सर्वांना पीआर कार्ड मिळणार असून, घरकुलही देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. निराधार व संजय गांधी योजनेच्या लाभार्थींना दरमहा दोन हजार रुपये लागू करावे, यासाठी उग्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.
पुष्पा चेचरे, जागृती वानखडे, वर्षा जयस्वाल, अर्चना चव्हाण, मीरा गणगणे, उषा गावंडे, पूजा वासनकर, मंदा राऊत, कुंदा डांगे, कमला वंजारी, वंदना काळे, रमा नितनवरे, विमल ढोके, संगीता ठाकरे, शारदा निखाळे, वनिता कावरे, जयश्री कुटे यांच्यासह अनेक मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका सुमती ढोके यांनी केले. ज्योती तोटेवार यांनीही विचार व्यक्त केले. सभामंडप जिल्हाभरातून आलेल्या महिलांनी खच्चून भरला होता.
दारुमुक्तीसाठी लढा
अमरावती ही अंबामातेची नगरी आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यानंतर जिल्हा दारूमुक्तीसाठी माझा लढा राहील, असे नवनीत राणा यांनी उपस्थिीत हजारो महिलांसमोर आपल्या विशेष शैलीत ठणकावून सांगितले. खा. अडसुळांवर टीका करताना त्या म्हणाल्या, जिल्ह्यावर बाहेरचे पार्सल लादले गेले आहे. विकास त्याचमुळे खुंटला आहे. मी या जिल्ह्याची सून असताना, माझ्या चारित्र्यावरही अनेकदा बोट दाखविले गेले. हा माझाच नव्हे येथे बसणाऱ्या नारीशक्तीचा अपमान आहे. धडा शिकविण्याची वेळ आता आली आहे.
काहींना विकास नव्हे, तर किराणा आवडतो - पालकमंत्री
अडसूळ साहेब, तुम्ही रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना आणला. पासपोर्ट सेवा केंद्र आणले. ही विकासात्मक कामे आहेत. मात्र, काहींना विकास नव्हे, तर किराणा आवडतो; तेल, मीठ आवडते, अशा शब्दांत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आ. रवि राणा यांचा नामोल्लेख न करता पासपोर्ट सेवा केंद्रांच्या उद्घाटनीय अध्यक्षीय भाषणातून प्रहार केला. त्यामुळे पालकमंत्री आणि आ. राणा यांच्यात राजकीय वाद पुन्हा उफाळून आल्याची चर्चा होती.
मुख्यमंत्र्यांनी निवडलेले मंत्री ‘बालकमंत्री’ कसे?
अमरावती : आपल्याला ‘बालकमंत्री’ म्हणून संबोधले. मात्र, आपल्याला पालकमंत्री बनविणाºया मुख्यमंत्र्यांचाच हा अपमान असल्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे म्हणाले. माझे मंत्रिपद जाणार असल्याच्याही वावड्या उठविल्या. आजही मीच पालकमंत्री आहे. उद्याही राहणार. विकासकामे कुणाचीही असली तरी भूमिपूजनाचे फलक आपलेच असले पाहिजे, असा टोला पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी राणा यांचे नाव घेता हाणला. विशेष असे की, आ. राणा हेदेखील त्या मंचावर उपस्थित होते. आ. रवि राणा यांच्यावर प्रहार केले जात असताना त्यांनी उठून पालकमंत्र्यांना पाण्याची बॉटल दिली. याप्रसंगी पालकमंत्र्यांनाही हसू आले. पालकमंत्र्यांनी ही राजकीय फटकेबाजी रविवारी महाराजस्व अभियानाच्या मंचावर केली. अलीकडे राणा-पोटे वाक्युद्धाने विराम घेतल्याचे वाटत असताना, पालकमंत्र्यांनी रविवारी डागलेल्या शब्दफैरीनंतर तो वाद पुन्हा सुरू झाला आहे.

Web Title: Poorly in front of the poor, not in front of the minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.