गावाची लोकसंख्या २० हजार, जुळले केवळ ३२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 04:55 PM2022-01-27T16:55:23+5:302022-01-28T15:51:45+5:30
कोरोनावर नियंत्रण ठेवण्याकरिता शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीची सभा ऑनलाइन घेणे गरजेचे असल्यामुळे प्रजाकसत्तादिनी पुसला गावात ही सभा ऑनलाइन पार पडली.
अमरावती : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाच्या परिपत्रकानसार ऑनलाइन ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. यानुसार प्रजासत्ताकदिनी पुसला येथे ग्रामसभा ऑनलाइन पार पडली. तथापि, गावाची २० हजार लोकसंख्या असताना केवळ ३२ नागरिक ऑनलाइन जुळले होते. ऑनलाइन ग्रामसभेला अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे गावाचा विकास कसा साधणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनावर नियंत्रण ठेवण्याकरिता शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीची सभा ऑनलाइन घेणे गरजेचे असल्यामुळे प्रजाकसत्तादिनी पुसला गावात ही सभा ऑनलाइन पार पडली. या सभेत गावातील विकास आराखाडा, मटन मार्केट, आठवडी बाजार, गावातील रस्ते, पाण्याचा प्रश्न, साफसफाई, घरकूल यादी, आरोग्य सेवा आदी मुद्दे गाजले. नागरिक आणि ग्रामपंचायत यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे ग्रामसभेत विकासाचे मुद्दे ग्राह्य ठरविले जातात. ग्रामसभेतून गावातील विकासाची दिशा दिली जाते. परंतु, वरुड तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या पुसला गावातील सुमारे २० हजार लोकसंख्या असताना केवळ ३२ जण जुळले.
कसे व्हावे ऑनलाईन? नागरिक अनभिज्ञ
सभेला सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व इतर उपस्थित होते. तथापि, नागरिकांच्या अल्प उपस्थितीमुळे नागरिकांना विकासाच्या मुद्यावर आपले मत मांडता आले नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. काही जण सहभागी कसे व्हावे, याबाबत अनभिज्ञ असल्याचे पुढे आले.
कोरोना पार्श्वभूमीवर ऑनलाईन ग्रामसभा पारदर्शक पद्धतीने झाली आहे. ग्रामसभेत मोठ्या प्रमाणात सहभागी होणे आवश्यक आहे. त्याकरिता जनजागृती करणे गरजेचे आहे.
- धनराज बमनोटे, सरपंच, पुसला