भाड्याच्या खोलीतील प्लायवूड पार्टिशनला छिद्र पाडून केली अश्लील व्हिडीओग्राफी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 09:21 PM2022-06-10T21:21:42+5:302022-06-10T21:22:56+5:30
Amravati News अश्लील छायाचित्रे व छायाचित्रण घरी दाखवून संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत एका लिपिकाकडे तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली.
अमरावती : अश्लील छायाचित्रे व छायाचित्रण घरी दाखवून संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत एका लिपिकाकडे तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. ही खंडणीची रक्कम घेण्यासाठी ते अमरावतीच्या राजापेठेत पोहोचलेदेखील. पण हाय रे नशीब, १० लाख रुपये हाती येण्याऐवजी त्यांच्याच हातात बेड्या पडल्या. दहा लाख रुपये घेऊन ऐश करण्याच्या त्यांच्या मनसुब्यावर ‘टीम राजापेठ’ने पाणी फेरले. हा धक्कादायक प्रकार राजापेठ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील डॉ. रघुवंशी यांच्या रुग्णालयाजवळ उघड झाला. विशेष म्हणजे, भाड्याच्या खोलीतील प्लायवूड पार्टिशनला छिद्र पाडून आरोपींनी ती अश्लील व्हिडीओग्राफी केली.
विजय शेषराव टिकस (३१, रा. वरूड) व प्रीतम रामराव धुर्वे (३८, रा. बहादा, ता. वरूड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींकडून न्यूड व्हिडीओ सेव्ह असलेला मोबाईल जप्त करण्यात आला. याविषयी दिलेल्या तक्रारीनुसार, गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे ५५ वर्षीय गृहस्थ वरूडला कारने ये-जा करतात. ते तेथे एका निमशासकीय संस्थेमध्ये लिपिक आहेत. दरम्यानच्या काळात वरूड येथे नोकरी करणाऱ्या एका महिलेशी त्यांची ओळख झाली. ते गृहस्थ मग तिला घेऊन वरूडला कारने ये-जा करू लागले. त्या लिपिकाने वरूड येथे खोली भाड्याने घेतली. तेथे ते फ्रेश होण्यासाठी जात होते. त्या खोलीत प्लायवूडचे पार्टिशन करण्यात आले होते. प्लायवूड शीटने विभागलेल्या त्या खोलीत त्या लिपिकासह अन्य काही तरूण राहात होते. दोन्ही आरोपींनी त्या खोलीतील प्लायवूड पार्टिशनला स्क्रू फिट बसेल, इतक्या आकाराचे छिद्र पाडले. काही दिवसांनी आरोपींनी त्या छिद्रातून त्या लिपिकाने महिलेशी घालवलेले अंतरंग क्षण मोबाईलमध्ये चित्रित केले. ३० मे रोजी आरोपींनी त्या लिपिकाला फोन कॉल करून ‘तुझी त्या महिलेसोबतची अश्लील छायाचित्रे व व्हिडीओ आपल्याकडे आहेत. ते दाखवून तुझा संसार उद्ध्वस्त करेन’, अशी धमकी देत पाच लाखांची मागणी केली. मोर्शी येथे ती रक्कम घेऊन येण्याची तंबी त्याला दिली. त्यावर लिपिकाने ते सीमकार्ड बंद करून दुसरे सीमकार्ड घेतले.
असा रचला सापळा
दरम्यान, ९ जून रोजी आरोपींपैकी एकाने त्या लिपिकाला पुन्हा तीच धमकी देत ५ लाखांऐवजी १० लाख रुपये खंडणी मागितली. त्याला राजापेठ येथील दवाखान्याजवळ बोलावण्यात आले. एक लाख रुपये घेऊन येतो, उर्वरित रक्कम नंतर देतो, अशी बतावणी करून त्या लिपिकाने आरोपींना राजापेठमध्ये बोलावले. दरम्यान, त्या लिपिकाने रात्री १०च्या सुमारास राजापेठ पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. रात्री १०.३०च्या सुमारास विजय व प्रीतम हे दुचाकीने रघुवंशी रुग्णालयाजवळ पोहोचले. यावेळी इशारा करताच त्या दोघांना राजापेठ पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वात अंमलदार सागर सरदार व टीम राजापेठने ही कामगिरी केली. दोघांविरुद्ध कलम ३८४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यातील विजय टिकस याच्याविरुद्ध वरूड पोलीस ठाण्यात वाटमारी व सट्ट्याचे गुन्हे दाखल आहेत.