पोर्टल बंद, नाफेड केंद्राची वाटचाल थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2022 05:00 AM2022-06-05T05:00:00+5:302022-06-05T05:01:00+5:30
नाफेडमार्फत चणा खरेदीला शासनाने मुदतवाढ दिल्यानंतर, २ जूनच्या रात्रीपासून संपूर्ण पोर्टल शासनाने बंद केल्याने, पुन्हा खरेदी बंद झाली. यामुळे नाफेडबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. ३१ मेपर्यंत नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी न झाल्याने शासनाने १८ जून अशी नवी तारीख दिली. तथापि, २४ मेचा कित्ता पुन्हा २ जून रोजी गिरविला गेला. पोर्टल बंद, तर खरेदी ठप्प झाली. ४२५ शेतकरी नोंदणी करून हरभरा विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : स्थानिक खरेदी-विक्री संघ अंतर्गत नाफेड केंद्रावर मुदतवाढीनंतर तालुक्यातील शेतकऱ्यांचा हरभऱ्याची खरेदी जोमात सुरू होती. परंतु, २ जून रोजी अचानक ऑनलाइन पोर्टल बंद पडल्यामुळे केंद्रावरील खरेदी बंद पडले आहे. जवळपास दोन ते अडीच क्विंटल हरभरा बाजार समितीच्या यार्डात खितपत पडून आहे.
कित्येक शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासून नावनोंदणी केली. परंतु, नाफेड केंद्रावर हरभऱ्याची विक्रमी आवक असल्यामुळे शेतकऱ्यांचा नंबर लागला नाही. आता कोणतीही पूर्वकल्पना न देता पोर्टल बंद करण्यात आले आहे.
शेतकरी झाले सोकारी
शेतकऱ्यांनी भाड्याच्या गाडीत विक्रीसाठी आणलेला हरभरा जागच्या जागीच उभ्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त भाड्याचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे, शिवाय येथे शेतकऱ्यांना आपल्या मालाची दिवसरात्र सोकारी करावी लागत आहे.
पावसाची भीती
कोणत्याही क्षणी पावसाने हजेरी लावल्यास उघड्यावर असलेल्या शेतमालाचे काय होणार, या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने लवकरात लवकर पोर्टल सुरू करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
नाफेडबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप
अंजनगाव सुर्जी : नाफेडमार्फत चणा खरेदीला शासनाने मुदतवाढ दिल्यानंतर, २ जूनच्या रात्रीपासून संपूर्ण पोर्टल शासनाने बंद केल्याने, पुन्हा खरेदी बंद झाली. यामुळे नाफेडबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. ३१ मेपर्यंत नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी न झाल्याने शासनाने १८ जून अशी नवी तारीख दिली. तथापि, २४ मेचा कित्ता पुन्हा २ जून रोजी गिरविला गेला. पोर्टल बंद, तर खरेदी ठप्प झाली. ४२५ शेतकरी नोंदणी करून हरभरा विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. नाफेड केंद्रावरून मालवाहू गाड्यांमध्ये शेतकऱ्यांनी आणलेला माल शेतकऱ्यांना परत घरी न्यावा लागला, त्यामुळे मालवाहू गाडीचे गाडीभाडे शेतकऱ्यांच्या माथी बसले. यापूर्वी बारदान्याअभावी नाफेडचे चणा खरेदी केंद्र तब्बल वीस दिवस बंद होते. अतिशय कमी दरात अनेक शेतकऱ्यांनी आपला माल बाजारात विकून टाकला. आता पुन्हा पोर्टल बंद असल्याने आणि खरिपाची पेरणी जवळ आल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
मी दोन दिवसांपूर्वी नावनोंदणी केली. माझा नंबर लागणारच होता की, पोर्टल बंद पडले. आता खरेदी केव्हा सुरू होणार, हे निश्चित नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच दैना होणार आहे. शेतकऱ्यांच्या या महत्त्वाच्या प्रश्नाविषयी सर्वच लोकप्रतिनिधींनी शासनाकडे आवाज उठवावा.
- सुरेंद्र मांडवगणे, शेतकरी, शेंदोळा खुर्द
केंद्र शासनाला अचानक पोर्टल बंद करायचे होते, तर अतिरिक्त नावनोंदणी करण्याची गरज नव्हती. नाफेड केंद्रावर बारदान्याचा तुटवडा आहे. तेव्हा पोर्टल सुरू करण्याआधी बारदाना उपलब्ध करून देण्यात यावा, अन्यथा पोर्टल सुरू होऊन काहीच उपयोग होणार नाही.
- गजानन अळसपुरे,
अध्यक्ष, खरेदी-विक्री संघ, तिवसा
शेतमाल भरून आमच्या गाड्या बाजार समिती आवारात उभ्या आहेत. उभ्या गाडीचे शेतकऱ्यांकडून आम्हाला अर्धे भाडे मिळेल. परंतु, दोन दिवसांपासून एकाच जागेवर गाड्या उभ्या असल्याने हवेचा दाब तयार होऊन गाडीचे टायर फुटण्याची दाट शक्यता आहे.
- संजय वऱ्हाडे,
गाडीमालक,वणी ममदापूर.