ऑनलाईन प्रणालीत अडकला पॉझिटिव्ह रुग्णांचा रिपोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:13 AM2021-05-10T04:13:37+5:302021-05-10T04:13:37+5:30
एकीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्याला नियंत्रणात आणण्याकरिता व ही साखळी तोडण्याकरिता प्रशासन कामाला लागले आहे. ...
एकीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्याला नियंत्रणात आणण्याकरिता व ही साखळी तोडण्याकरिता प्रशासन कामाला लागले आहे. आरटीपीसीआर चाचणीदेखील बंधनकारक करण्यात आली आहे. त्यात आरटीपीसीआर चाचणीचा ऑनलाईन रिपोर्ट जर रुग्णाला वेळेत मिळत नसेल तर रिपोर्टच्या प्रतीक्षेतील रुग्णाच्या मुक्तसंचारामुळे रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
तिवसा ग्रामीण रुग्णालयात ३० एप्रिल रोजी करण्यात आलेल्या काही रुग्णांचे आरटीपीसीआर रिपोर्ट हे चक्क शुक्रवार (दि. ७)पर्यंतही उपलब्ध न झाल्याने अखेर येथील एका रुग्णाने तिवसा येथे विविध ठिकाणी चौकशी केली. येथून रिपोर्ट न मिळाल्याने अखेर त्यास अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातून त्याचा रिपोर्ट आणावा लागला. त्यातही तो रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णाच्या नातेवाइकांनी या ऑनलाईन प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून वेळेत रिपोर्ट मिळत नसला तरी किमान पॉझिटिव्ह रुग्णाच्या मुक्तसंचारापूर्वीच त्याला याबाबत अवगत करून रुग्णास वेळेत उपचारासाठी आरोग्य यंत्रणेने सहकार्य करणे गरजेचे आहे.