सिटी पॅलेस महापालिकेच्या ताब्यात
By admin | Published: January 25, 2017 12:08 AM2017-01-25T00:08:06+5:302017-01-25T00:08:06+5:30
यंत्रणेला वाकुल्या दाखविणाऱ्या सी.एल.खत्री यांच्या ताब्यातील हॉटेल सिटी पॅलेस मंगळवारी महापालिकेने ताब्यात घेतले.
कार्यालय स्थापित : उपायुक्त वानखडेंची कारवाई
अमरावती : यंत्रणेला वाकुल्या दाखविणाऱ्या सी.एल.खत्री यांच्या ताब्यातील हॉटेल सिटी पॅलेस मंगळवारी महापालिकेने ताब्यात घेतले. या जागेवर आता महापालिकेतील विविध कार्यालये स्थापन केले जातील. उपायुक्त सामान्य नरेंद्र वानखडे यांनी मंगळवारी ही कारवाई केली. महापालिकेच्या इतिहासातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई आहे.
राजकमल चौकस्थित दादासाहेब खापर्डे संकुलातील हॉटेल सिटी पॅलेसची वापरात नसलेली जागा कार्यालय स्थापन करण्याकरिता रिकामी करून द्यावी, असे पत्र या संकुलाचे विकासक सी.एल.खत्री यांना ३० डिसेंबर २०१६ रोजी देण्यात आले होते, हे विशेष.
खत्री ‘नॉट रिचेबल’
अमरावती : त्यानंतरही वारंवार त्यांच्याशी महापालिकेने संपर्क साधण्यात आला. मात्र, खत्री यांचेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. आयुक्तांच्या सूचनांनाही खत्री यांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच या हॉटेलला महापालिकेकडून सिल लावण्यात आले होते. त्यानंतरही खत्री यांनी प्रतिसाद न दिल्याने मंगळवारी हे हॉटेल महापालिकेने अधिकृतरीत्या ताब्यात घेतले. बाजार व परवाना विभागाच्या अधीक्षक निवेदिता घार्गे यांच्यासह अतिक्रमण विभागाने संयुक्तरीत्या ही कारवाई केली.
दादासाहेब खापर्डे संकुलातील पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर असलेल्या हॉटेल सिटी पॅलेसचे बांधकाम सुमारे ७ हजार चौरस फूट आहे. महापालिकेत तूर्तास सुरू असलेल्या विविध योजनांच्या कार्यान्वयनासह काही विभागांसाठी महापालिकेला जागेची आवश्यकता होती. त्यामुळे हॉटेल सिटी पॅलेस ताब्यात घेण्यात आले. आता याठिकाणी बाजार परवाना विभागासह अतिक्रमण आणि एनयूएलएम याविभागांची कार्यालये साकारली जातील. (प्रतिनिधी)
महापालिकेला कार्यालयांकरिता जागेची अडचण असल्याने वापरात नसलेली हॉटेल सिटी पॅलेसची जागा मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेण्यात आली. त्याठिकाणी महापालिकेतील काही विभागांची कार्यालये साकारली जातील.
- नरेंद्र वानखडे,
उपायुक्त (सामान्य), महापालिका