तिसरे पॅनल गठनाची शक्यता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:15 AM2021-09-22T04:15:33+5:302021-09-22T04:15:33+5:30
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ४ ऑक्टोबर रोजी होऊ घातली आहे. त्याअनुषंगाने प्रमुख दोन पॅनलने १४ तालुक्यांतील ...
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ४ ऑक्टोबर रोजी होऊ घातली आहे. त्याअनुषंगाने प्रमुख दोन पॅनलने १४ तालुक्यांतील सेवा सहकारी सोसायटी वगळता सात प्रवर्गांमधील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. अनेक दिग्गजांना पॅनलमध्ये स्थान न मिळाल्याने आता तिसरे पॅनल गठित होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्हा बँकेत २१ संचालकपदाच्या निवडीसाठी ४ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. २२ सप्टेंबर रोजी नामांकन मागे घेण्याचा अवधी आहे. त्यानुसार १०५ पैकी आतापर्यंत नऊ उमेदवारांनी नामांकन मागे घेतले आहे. बुधवारी मोठ्या प्रमाणात नामांकन मागे घेण्यात येणार असून, कोण मैदानात टिकून राहते, हे दुपारी ३ नंतर स्पष्ट होणार आहे. मात्र, सहकार विरुद्ध परिवर्तन अशा दोन पॅनलमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक रंगतदार होत असल्याचे प्रचारावरून दिसून येते. प्रमुख दोन्ही पॅनलकडून इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती व जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग, महिला राखीव, वैयक्तिक भागीदार, नागरी सहकारी बँक पतसंस्था अशा विविध सात मतदारसंघांमधून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र, ज्या उमेदवारांना पॅनलमध्ये स्थान मिळाले नाही, अशांकडून नव्याने तिसरे पॅनल गठनाची जोरदार तयारी चालविली आहे. यात काही विद्यमान संचालकांचीही समावेश असणार आहे.
-------------------
दोन महिला संचालकांसाठी १३ नामांकन
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दोन महिला संचालक या महिला राखीव मतदारसंघातून निवडून जाणार आहेत. त्याकरिता १६८६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मात्र, दोन जागा आणि १३ नामांकन असल्याने किती महिला उमेदवार नामांकन मागे घेतात अथवा कायम ठेवतात, हे बुधवारी ३ नंतरच स्पष्ट होणार आहे. पॅनलमध्ये स्थान न मिळाल्याने अनेक उमेदवारांना ‘कहीं खुशी, कही गम’ असा अनुभव येणार आहे.