चौकशीच्या आश्वासनानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:55 PM2019-03-12T22:55:52+5:302019-03-12T22:56:38+5:30

कोतवालीचे सहायक पोलीस उपनिरीक्षक रामसिंह गुलाबसिंह चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मंगळवारी पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांची भेट घेतली. सुसाईड नोटमध्ये नोंद असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी रेटून धरली.

Post mortem of the dead body after assassination | चौकशीच्या आश्वासनानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन

चौकशीच्या आश्वासनानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन

Next
ठळक मुद्देएएसआय आत्महत्या प्रकरण : पोलीस उपायुक्तांच्या कक्षात नातेवाईकांचा आक्रोश

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोतवालीचे सहायक पोलीस उपनिरीक्षक रामसिंह गुलाबसिंह चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मंगळवारी पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांची भेट घेतली. सुसाईड नोटमध्ये नोंद असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी रेटून धरली. पोलिसांनी पारदर्शक चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी रामसिंह चव्हाण यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची तयारी दर्शविली.
सहायक पोलीस उपनिरीक्षक रामसिंह चव्हाण यांनी सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत तत्कालीन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण व हेड मोहरीर यांची नावाचा उल्लेख आत्महत्येस कारणीभूत असल्याबाबत केला होता. पोलीस खात्यातील एएसआयची आत्महत्या व त्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली. या घटनेकडे पोलीस वर्तुळानेही लक्ष वेधले.
नातेवाइकांनी मंगळवारी पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांची भेट घेऊन रामसिंह चव्हाण यांनी अनुभवलेल्या मानसिक ताणाची जाणीव करून दिली. त्यांनी वेतन मिळविण्यासाठी किती प्रयत्न केले, त्यांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना कशाप्रकारे मानसिक खच्चीकरण केले, याबाबत सर्व इत्थंभूत माहिती रामसिंह यांच्या नातेवाइकांनी डीसीपी सोळंके यांना दिली. रामसिंह यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिल्याप्रमाणे संबंधित तत्कालीन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस उपायुक्त चव्हाण व हेड मोहरीर यांच्याविरुद्ध कारवाई करा, त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवा, अन्यथा आम्ही मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला. यावर डीसीपी सोळंके व शशिकांत सातव यांनी नातेवाइकांना चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईक रामसिंह यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास तयार झाले.
इर्विन रुग्णालयात रामसिंह चव्हाण यांच्या मृतदेहाचे सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर त्यांचे पार्थिव नातेवाइकांनी ताब्यात घेतले. सायंकाळनंतर रामसिंह चव्हाण यांच्या मृतदेहावर हिंदू स्मशानभूमीवर अत्यसंस्कार करण्यात आले.
रामसिंह यांच्यासोबत अपमानास्पद वागणूक
रामसिंह चव्हाण सोमवारी सकाळी ११ वाजता पोलीस आयुक्तालयात गेले होते. तेथे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन ते सर्व बाबींची शहानिशा करणार होते. मात्र, त्यांना एका पोलीस कर्मचाºयाने अपमानास्पद वागणूक देऊन जाण्यास सांगितले. यानंतरच रामसिंह यांनी घरी जाऊन आत्महत्या केल्याचे नातेवाईक पोलीस उपायुक्तांना सांगत होते. २०१४ पासून रामसिंह चव्हाण अनेकदा वरिष्ठ अधिकाºयांकडे चकरा घातल्या; मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. रामसिंह यांना जोखमीच्या कर्तव्यावर लावले जात असल्याने ते ड्युटीवर जाण्यासाठी भीत होते. त्यातच वेतनाअभावी आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यांनी काही जणांकडून पैसे उधारसुद्धा घेतले होते. अशा परिस्थितीत पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी मानसिक खच्चीकरण केल्याने रामसिंह यांनी टोकाचे पाऊल उचलले, असे नातेवाइकांनी पोलीस उपायुक्तांना सांगितले. यावेळी रामसिंह यांच्या पत्नी अनिता, त्यांचा मुलगा सागर, अमन व अन्य नातेवाईक उपस्थित होते.

निवेदनातील प्रत्येक बाबीची चौकशी करण्यात येईल. रामसिंह चव्हाण यांच्यासोबत २०१४ पासूनच्या जे-जे घडले, त्या बाबी तपासून पाहिल्या जातील. पारदर्शक चौकशी करून दोषींवर नक्कीच कारवाई केली जाईल.
- यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त.

एएसआयच्या आत्महत्याप्रकरण नातेवाइकांचे निवेदन प्राप्त झाले. कायद्याच्या चाकोरीत राहून संपूर्ण तथ्ये तपासली जातील. त्यानंतर जे दोषी असतील, त्यांच्याविरुद्ध कारवाई करू. चव्हाण कुटुंबीयांना लेखी आश्वासन दिले आहे.
- आसाराम चोरमले, पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुरा.

Web Title: Post mortem of the dead body after assassination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.