फ्रेजरपुऱ्यातील कुख्यातावर एमपीडीए, कारागृहात स्थानबध्द
By प्रदीप भाकरे | Updated: April 13, 2024 20:01 IST2024-04-13T20:01:35+5:302024-04-13T20:01:56+5:30
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

फ्रेजरपुऱ्यातील कुख्यातावर एमपीडीए, कारागृहात स्थानबध्द
अमरावती: फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गुन्हेगार मोहित उर्फ भैय्यू सुभाष सुर्यवंशी (२२, रा. लायब्ररी चौक) याच्याविरूध्द एमपीडीए अन्वये कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार त्याला १३ एप्रिल रोजी एक वर्षांसाठी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
कुख्यात गुन्हेगार मोहित उर्फ भैय्यू सूर्यवंशी हा सन २०२१ पासुन गुन्हेगारी कार्यवाहीमध्ये लिप्त आहे. त्याचेविरुध्द फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात अश्लिल शिवीगाळ, गृह अतिक्रमण, जिवाने ठार मारण्याचा प्रयत्न, सामाईक इरादा, गंभीर दुखापत, शिवीगाळ करून जिवाने मारण्याची धमकी, घातक शस्त्र बाळगणे, हद्दपार आदेशाचे उल्लघंन असे गंभीर स्वरूपाचे एकुण १३ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरूध्द यापूर्वी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. त्याला तडीपार देखील करण्यात आले.
मात्र त्याच्या गुन्हेगारी कारवाईला आळा बसला नव्हता. त्यामुळे ठाणेदार मनिष बनसोड यांनी त्याच्याविरूध्द एमपीडीए करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविला. त्या प्रस्तावाची सहायक पोलीस आयुक्त शिवाजीराव बचाटे व पोलीस निरिक्षक राहुल आठवले यांनी पुर्तता केली. त्या प्रस्तावावर पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी १३ एप्रिल रोजी आदेश पारीत केले. आदेश तामिल करून त्याला शनिवारी स्थानबध्दतेच्या कालावधीकरीता मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले.