संत गुलाबराव महाराज यांच्यावर डाकतिकीट, गीता जयंतीच्या मुहूर्तावर प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 06:11 PM2018-07-18T18:11:28+5:302018-07-18T18:12:12+5:30
संत गुलाबराव महाराज यांच्यावरील डाक तिकिटाचे प्र्रकाशन १९ डिसेंबर रोजी भक्तिधाम संस्थान (ता. चांदूरबाजार) येथे गीता जयंतीच्या मुहूर्तावर होत आहे.
अमरावती : प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज यांच्यावरील डाक तिकिटाचे प्र्रकाशन १९ डिसेंबर रोजी भक्तिधाम संस्थान (ता. चांदूरबाजार) येथे गीता जयंतीच्या मुहूर्तावर होत आहे.
अमरावती फिलाटेलिक सोसायटी व श्री संत गुलाबराव महाराज सेवा संस्था (भक्तिधाम, ता. चांदूरबाजार) यांच्या संयुक्त विद्यमाने याबाबत प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता. सोसायटीचे अध्यक्ष कृ.ब. निंबाळकर हे प्रस्तावक आहेत. अमरावती फिलाटेलिक सोसायटीमार्फत पाठविलेल्या चार प्रस्तावांपैकी शिवाजीराव तथा दाजीसाहेब पटवर्धन यांच्यावरील डाकतिकीट २७ डिसेंबर २०१७ रोजी प्रकाशित झाले, तर संत गुलाबराव महाराजांवरील डाकतिकीट प्रकाशित होत आहेत. स्वातंत्र्यसेनानी दादासाहेब खापर्डे व वीर वामनराव जोशी यांच्यावरील डाकतिकिटाचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.
विदर्भातील १० महापुरुषांच्या स्मरणार्थ आतापर्यंत डाकतिकीट प्रकाशित झाले आहेत. जमनालाल बजाज यांच्यावरील डाकतिकीट १९७० मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (१९९५), कर्मयोगी संत गाडगेबाबा (१९९८), डॉ. केशव हेडगेवार (१९९९), कृषिमहर्षी भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख (१९९९), ब्रिजलाल बियाणी (२००२), जवाहरलाल दर्डा (२००५), डॉ. माधव श्रीहरी अणे (२०११), बाबा आमटे (२०१४) व डॉ. शिवाजीराव पटवर्धन (२०१७) यांची डाकतिकिटे प्रकाशित झाली. विशेष म्हणजे, डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्यानंतर कर्मभूमीतच डाकतिकिटाचे प्रकाशन होणारी संत गुलाबराव महाराज ही अमरावती जिल्ह्यातील दुसरी व्यक्ती ठरणार आहे.