पुन्हा पोटेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 10:30 PM2018-05-24T22:30:04+5:302018-05-24T22:31:46+5:30

प्रवीण पोटेंचा लीड किती, एवढीच उत्सुकता बाकी असलेल्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी सकाळी साडेनऊला जाहीर झाला तेव्हा सर्व राजकीय निरीक्षकांचे आडाखे मोडीत निघाले. पोटेंनी एकूण ४७५ वैध मतांच्या तुलनेत ४५८ म्हणजेच ९६.४२ टक्के मते मिळवित नवा कीर्तिमान स्थापन केला.

Pote again | पुन्हा पोटेच

पुन्हा पोटेच

googlenewsNext
ठळक मुद्देसलग चौथ्यांदा मतदारसंघ भाजपाकडे :प्रवीण पोटे ४५८, माधोगडियांना १७ मतेऐतिहासिक विजय

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रवीण पोटेंचा लीड किती, एवढीच उत्सुकता बाकी असलेल्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी सकाळी साडेनऊला जाहीर झाला तेव्हा सर्व राजकीय निरीक्षकांचे आडाखे मोडीत निघाले. पोटेंनी एकूण ४७५ वैध मतांच्या तुलनेत ४५८ म्हणजेच ९६.४२ टक्के मते मिळवित नवा कीर्तिमान स्थापन केला. काँग्रस उमेदवार अनिल माधोगडिया यांना अवघी १७ मते पडली. राज्यात आजवर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील हा विक्रम मानला जात आहे.
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात सकाळी ८ वाजता सुरू झाली. अगदी तासाभरात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक प्रमुख अभिजित बांगर यांनी निकालाची घोषणा केली. निवडणुकीत एकूण ४८८ मतदान झाले. यामध्ये १० मते अवैध ठरविण्यात आली. तीन मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला. त्यामुळे १३ मते बाद ठरविण्यात आल्याने एकूण ४७५ मते वैध ठरली. या निवडणुकीत फक्त दोनच उमेदवार रिंगणात असल्याने ‘सिंगल ट्रान्सफर वोट’ ही संकल्पनाच बाद झाली.
ती १७ मते कुणाची?
एकूण वैध मतांच्या निम्मे अधिक एक असा २३८ हा विजयी मतांचा कोटा ठरला. अवघ्या अर्ध्या तासात एकाच टेबलवर झालेल्या मतमोजणीमध्ये भाजपचे उमेदवार प्रवीण पोटेंना ४५८, तर काँग्रेसचे उमेदवार अनिल माधोगडिया यांना फक्त १७ मते मिळाल्याचे स्पष्ट झाले. माधोगडिया यांच्या मतांमध्ये स्वत:च्या एक मताचादेखील समावेश आहे. पोटे हे ४४१ मताधिक्याने विजयी झाले. आयोगाची परवानगी मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृतरीत्या निकालाची घोषणा केली. माधोगडिया यांना मिळालेली १७ मते कुणाची, याची चर्चा शहरात सुरू आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे निरीक्षक म्हणून जे.पी. गुप्ता मतमोजणी प्रक्रियेदरम्यान उपस्थित होते. मतमोजणीसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे दोन अधिकारी, दोन तहसीलदार व दोन नायब तहसीलदार यांचे पथक होते. संपूर्ण प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित बांगर व उपप्रमुख शरद पाटील लक्ष ठेवून होते. संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली.

उमेदवारी जाहीर झाली, त्याच दिवशी विजयाची खात्री होती. हा विजय भाजप व मित्रपरिवाराचा आहे. विकासाच्या ध्येयावर भरभरून मते दिल्यानेच राज्यात विक्रमी मतांनी विजयी झालो. भविष्यात अमरावती शहराच्या चौफेर विकासाचे चित्र दिसेल.
- प्रवीण पोटे

भाजप उमेदवारांनी विजयासाठी अन्य मार्गाचा वापर केला. मतदारास प्रलोभने दिली. निवडणुकीचा कौल आपणास मान्य आहे. पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने पक्षाचे कार्य आपण करीत राहणार आहोत.
- अनिल माधोगडिया

शेगावहून सकाळी ११ वाजता पोटेंचे आगमन
संत गजानन महारांजांचे निस्सीम भक्त असलेले प्रवीण पोटे गुरुवारी पहाटेच दर्शन घेण्यासाठी शेगावला गेले होते. साधारणपणे १०.३० वाजता ते अमरावतीला पक्ष कार्यालयात आले. नंतर लगेच त्यांच्या कार्यालयात पोहोचले व सकाली ११.३० वाजता ते मतमोजणी स्थळी आलेत व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित बांगर यांच्याकडून त्यांनी विजयी झाल्याचे प्रमाणपत्र स्वीकारले. नंतर ते निवासस्थानी गेले व त्यानंतर त्यांनी कार्यालयातच स्वागताचा स्वीकार केला.
चार टर्मपासून काँगे्रसच्या गडाला खिंडार
तसे पाहता स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला. यापूर्वी अधिराज्य गाजविलेल्या या मतदारसंघात बहुमत असतानाही सलग चार टर्म काँगे्रसला पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. गटातटाच्या राजकारणात पोखरला गेलेला काँगे्रसचा भक्कम गड ढासळायला लागला. काँग्रेसच्या वसुधा देशमुख यांच्या सलग दोन टर्मनंतर सलग दोन वेळा भाजपच्या जगदीश गुप्तांनी बाजी मारली. त्यानंतर सलग दोन वेळा प्रवीण पोटे विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या तीन टर्ममध्ये काँग्रेस उमेदवार लढतीत तरी होते. यंदा मात्र नामुष्कीची वेळ पक्षावर आली.
हे आहे पोटेंच्या विजयाचे गमक
राज्यमंत्री झाल्यावरही प्रवीण पोटेंचे पाय जमिनीवरच राहिले. म्हणूनच त्यांच्या कार्यालयात, शासकीय विश्रामगृहात आतापर्यंत दोन लाखांवर नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. कुठल्याही पक्षाशी तेढ नसल्यामुळे यावेळी सुरुवातीलाच शिवसेना व प्रहार यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिल्याने स्पष्ट बहुमत त्यांच्याजवळ होते. राज्यमंत्रिपदाच्या अखेरच्या वर्षात त्यांनी सातत्यांनी तालुकानिहाय दौरे केले व सर्व पक्षांच्या मतदारांसोबत त्यांचे सौहार्दाचे संबंध राहिले. या तुलनेत काँग्रेसचा उमेदवार नवखा व मतदाराशी हात राखून असल्याने पोटेंनी विक्रमाला गवसणी घातली.
भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोश
निवडणूक निकाल सकाळी ९.३० ला जाहीर होताच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर असलेले भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोश केला. ढोल-ताशांच्या ठेक्यावर अनेकांनी ताल धरला. महिला पदाधिकाºयांनी झिम्मा-फुगडी खेळत विजयाचा जल्लोश केला. त्याचवेळी पोटेंचे इर्विन चौकातील कार्यालय तसेच राजापेठ स्थित भाजप कार्यालय व त्यांच्या राठीनगरातील निवासस्थानी उत्साहाला उधाण आले होते.

Web Title: Pote again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.