खड्डे, विरुद्ध दिशेच्या वाहतुकीमुळे 'ट्रॅफिक जाम'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 10:21 PM2017-10-09T22:21:29+5:302017-10-09T22:21:55+5:30
खड्डे व विरुद्ध दिशेच्या वाहतुकीमुळे राजापेठ चौकात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. वाहनचालक हैराण झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खड्डे व विरुद्ध दिशेच्या वाहतुकीमुळे राजापेठ चौकात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. वाहनचालक हैराण झाले आहेत. या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकांना बसत असून प्रशासनाला अप्रिय घटनेची प्रतिक्षा तर नाही ना, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
राजापेठ रेल्वे क्रॉसिंगसाठी उड्डाणपूल निर्मितीचे काम प्रगतीपथावर असताना वाहतुकीच्या कोंडीचा अमरावतीकरांना सामना करावा लागत आहे. उड्डाणपुलालगतच्या मार्गावरून वाहतूक सुरु असताना रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे.
महापालिकेच्या अखत्यारित असणारा हा मार्ग गेल्या अनेक दिवसांपासून खड्डेमय झाला आहे. मात्र, त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या मार्गाने दिवसरात्र वाहनांची मोठी वर्दळ असते. खड्ड्यांमुळे बहुतांश वाहनचालक गती कमी ठेवतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन लांब रांगा लागतात. इतकेच नव्हे विरुद्ध दिशेने होणाºया वाहतुकीमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. ही दररोजची स्थिती असतानाही प्रशासकीय यंत्रणा गप्प बसली आहे. याच मार्गाने दररोज अनेक शासकीय अधिकाºयांची वाहने जातात. मात्र, वाहतुकीची कोंडी होत असतानाही दुर्लक्ष चालविले जात आहे. ही वाहतुकीची कोंडी अप्रिय घटनेला आमंत्रण देणारीच ठरत आहे.
राँगसाईड वाहनचालकावर कारवाई
सोमवारी ११.१५ वाजताच्या सुमारास दररोजप्रमाणे राजापेठ चौकात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. ही कोंडी कशामुळे झाली, नेमका काय प्रकार घडला, हे पाहण्यासाठी काही वाहतूक पोलीस वाहनाच्या वर्दळीत शिरले. तेव्हा एका चारचाकी एमएच २७ बीएक्स ०४७४ क्रमाकांचे वाहन वर्दळीतून विरुद्ध दिशेने येताना दिसले. पोलिसांनी त्या वाहनाला बाहेर काढल्यानंतर वाहतूक सुरळित झाली. त्या वाहनचालकाविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगासुद्धा उगारला आहे.