पोल्ट्री फार्म लक्ष्य; तिघे ‘कोंबडीचोर’ जेरबंद, खोलापूर, रहिमापूरसह अकोल्याचा गुन्हा उघड
By प्रदीप भाकरे | Published: November 25, 2023 05:40 PM2023-11-25T17:40:35+5:302023-11-25T17:41:23+5:30
दुचाकी, चारचाकी जप्त
अमरावती: पोल्ट्री फार्म लक्ष्य करून तेथून हजारो कोंबड्या चोरणाऱ्या एका त्रिकुटाला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले. तिघेही अकोला जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांच्या अटकेने जिल्ह्यातील खोलापूर, रहिमापूर व अकोला जिल्ह्यातील माना पोलीस ठाण्यात नोंद कोंबडी चोरीच्या तीन घटनांना उलगडा झाला आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, चारचाकी, मोबाईल, रोख रकमेसह एकुण ५ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दानिश खान फिरोज खान (२४, रा. नया घरकुल, मुर्तिजापूर), पवन प्रल्हाद लसनकर (३३, रा. पिंजर ता. बार्शीटाकळी, जिल्हा अकोला) व महेमूद शहा मोहंमद शहा (३८, रा. पठानपुरा मुर्तिजापूर) अशी अटक कोंबडीचोरांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खोलापूरमधील एका कोंबडी चोरीप्रकरणाचा तपास करत असताना ती चोरी दानिश खान उर्फ राजा फिरोज खान याने त्याच्या साथीदारासह केल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून एलसीबीने मुर्तिजापूर गाठून तिघांनाही अटक केली. दानिशने साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली.
अशा पळविल्या कोंबड्या
२३ ऑक्टोबर रोजी रात्री आरोपींनी वलगाव ते खोलापूर रोडवरील एका पोल्ट्रीफार्ममधून २०० कोंबडया चोरून नेल्या. पिकअप वाहनात टाकून आरोपी मुर्तिजापूरला आले. त्या कोंबड्या पवन लसनकर याला ४० हजारांत विकल्या. मिळालेले पैसे चौघांनी आपसात सारखे वाटून घेतले. सोबतच आरोपींनी अंजनगाव ते दर्यापूर रोडलगतच्या पोल्ट्री फार्ममधून१५० कोंबडया चोरल्या. याप्रकरणी खोलापूर व रहिमापूर ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले.
रेकी करण्यासाठी वापरली दुचाकी रेकी करण्यासाठी वापरलेली एमएच ३० बीएस ५७८८ ही दुचाकी, मोबाईल, कोंबडया विक्रीतून आलेले १९,३०० रुपये व एमएच २९ बिई २५२८ हे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. या गुन्हयात सै. समीर सै. सलीम (रा. आकोट फाईल, अकोला) व शेख आमिर (रा. मुर्तिजापूर) हे दोघे फरार आहेत. अटक आरोपींना खोलापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनात तथा स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख किरण वानखडे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक संजय शिंदे, अंमलदार त्रंबक मनोहर, सुनिल महात्मे, सैयद अजमत, निलेश डांगोरे, अमोल केंद्रे, सागर धापड, हर्षद घुसे यांनी ही कारवाई केली.