साहित्यिकांच्या शब्दात बंदुकीची शक्ती
By admin | Published: November 30, 2014 10:56 PM2014-11-30T22:56:03+5:302014-11-30T22:56:03+5:30
साहित्यिकांना बंदूक घेण्याची गरज नाही, त्यांच्या शब्दातच ती शक्ती असते. बंदूक घेणाऱ्यांना धैर्य देण्याचे काम ते करत असतात, असे मत सुप्रसिध्द भागवतकार किशोरजी व्यास यांनी व्यक्त केले.
किशोरजी व्यास : स्व. राम शेवाळकरांच्या स्मारकाचे लोकार्पण
अचलपूर : साहित्यिकांना बंदूक घेण्याची गरज नाही, त्यांच्या शब्दातच ती शक्ती असते. बंदूक घेणाऱ्यांना धैर्य देण्याचे काम ते करत असतात, असे मत सुप्रसिध्द भागवतकार किशोरजी व्यास यांनी व्यक्त केले.
येथील माळवेशपुऱ्यातील शेवाळकर सभागृहात साहित्यिक राम शेवाळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण किशोरजी व्यास यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृष्णाशास्त्री आर्वीकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून स्वानंद पुंड, अधिव्यख्याता किशोर फुले उपस्थित होते.
किशोरजी व्यास हे आपल्या भाषणात भावविवश झाले होते. ते म्हणाले की, याच ठिकाणी मी भागवत कथेवर प्रवचन करीत होतो. ते श्रोता म्हणून ऐकत होते. ते सात दिवस आनंदाचे होते. इतक्या लवकर हा प्रसंग येईल, असे वाटत नव्हते. परंतु स्थित प्रज्ञेप्रमाणे परमेश्वर जे करेल ते पहावे लागते. नानासाहेब (राम शेवाळकर) पूज्य साहित्यिक होते. महान परंपरेचे पाईक होते. हे त्यांच्या नसातच नव्हते, तर त्यांच्या डीएनएतही होते. नानासाहेब मोठे व्यक्ते होते. मोठे साहित्यिक होते हे मान्य, पण ते स्वच्छ माणूस होते. त्यांचा एक पैलू म्हणजे सत्य व संस्कृती यासाठी ते ठाम होते.
वेळ पडेल तेव्हा साहित्यिकांनी आक्रमक व्हावे, याचे उदाहरण देताना व्यास म्हणाले की, मुंबईच्या एका नेत्याने जेव्हा साहित्यिकाविषयी अनुद्गार काढले तेव्हा दुसऱ्याच दिवशी नानासाहेब उपाख्य राम शेवाळकरांनी शासनाने दिलेला पुरस्कार परत केला. तेव्हा ऐन दिवाळीच्या दिवशी कांची कोठीच्या शंकराचार्यांना अटक करण्यात आली. तेव्हा त्याचा निषेध करण्यासाठी नागपूरच्या रस्त्यावर झालेल्या आंदोलनात ते अग्रस्थानी होते. असे सत्याकरिता, धर्मासाठी नीतीमूल्य जोपासणारे साहित्यिक फार कमी आहेत. नानासाहेब गुणांची खाण होते. आपले सद्गुण कोठे वापरावे हा विवेक लागतो, तो त्यांच्यात होता. समाजातील वातावरण बदलण्यासाठी साहित्यिकांची फळी निर्माण करण्यासाठी त्यांनी एक तशी फळी उभी केली आहे. त्यांचा महाभारताचा व्यासंग व संस्कृत भाषेचे पांडित्य असे ते चालते-बोलते विद्यापीठ होते. भाषणातून त्यांनी नानासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
नानासाहेब शब्दप्रभू- किशोर फुले
किशोर फुले म्हणाले, त्यांच्या जगण्यातून महाराष्ट्रात सुगंध पसरला. शब्दांचा सामर्थ्य असणारे ते शब्दप्रभू होते. त्यांच्या शब्दांना रांगोळीची जोड नव्हती, जगण्याची ओढ होती.