विजेचा लपंडाव बेततोय जीवावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 01:23 AM2019-03-08T01:23:13+5:302019-03-08T01:24:01+5:30

शहरात नियमितपणे होत असलेल्या विजेच्या लपंडावाचा फटका आरोग्यसेवेलाही बसत आहे. अलीकडे बड्या रुग्णालयांमध्ये लागणाऱ्या यंत्रणा अत्याधुनिक असतात. त्यांना २४ तास विजेची गरज असते. मात्र, काहीही कारण नसताना दररोज अनेक प्रभागांत विजेचा लपंडाव केला जात असल्याने अतिदक्षता विभागातील यंत्रणा ठप्प पडतात.

The power of the light is worthless! | विजेचा लपंडाव बेततोय जीवावर!

विजेचा लपंडाव बेततोय जीवावर!

Next

संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात नियमितपणे होत असलेल्या विजेच्या लपंडावाचा फटका आरोग्यसेवेलाही बसत आहे. अलीकडे बड्या रुग्णालयांमध्ये लागणाऱ्या यंत्रणा अत्याधुनिक असतात. त्यांना २४ तास विजेची गरज असते. मात्र, काहीही कारण नसताना दररोज अनेक प्रभागांत विजेचा लपंडाव केला जात असल्याने अतिदक्षता विभागातील यंत्रणा ठप्प पडतात. त्याकारणाने उपचार सुरू असताना नवजात शिशू अत्यवस्थ होऊन जिवालाही धोका निर्माण शक्यता नाकरता येत नाही. रविवारीसुद्धा बत्ती गूल होत असल्याने नागरिकांच्या ‘हॉलिडे’ नियोजनावर पाणी फेरले जात आहे.
इतर दिवसांप्रमाणे रविवारही अनेकदा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नोकरदारांसह अनेकांच्या नियोजनावर पाणी फेरले जाते. पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित होत असल्याने काही दिवसांपासून नागरिकांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. नियोजित भारनियमन नसताना महावितरणकडून विजेचा लपंडाव केला जात आहे. वीज ही मानवी जीवनातील अविभाज्य घटक बनली आहे. त्याकारणाने नागरिकांना २४ तास विद्युत मिळणे अपेक्षित आहे. चांगली विद्युत सेवा मिळावी, या उद्देशानेच सोफीया प्रकल्पाला तेव्हा मान्यता देण्यात आली. तथापि, येथे वीजनिर्मिती होऊनही शहराला फायदा झालेला नाही. वीज इतरत्र विकली जाते, तर शहरातील अर्जुननगर, विनायक नगर, रुख्मिनीनगरासह अनेक प्रभागात नेहमीच हा विजेच्या लपंडावाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
विशेषत: रविवारीसुद्धा बत्ती गूल होत असल्याने नागरिकांची मोठी पंचाईत होेते. कारण सुटीचा दिवस पाहून हौैशी नागरिकांनी आप्तमंडळींसमवेत वेगवेगळे बेत आखलेले असतात. कुठे जेवणाची मेजवानी, तर कुठे छोेटेखानी कार्यक्रम ठरलेले असतात. घरगुती होम थिएटर्सवर चित्रपट बघत सुटीची मौज घेण्याचा बेत असतानाच बत्ती गूल होत असल्याने नागरिकांच्या नियोजनावर पाणी फेरले जाते.
वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिक महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. मात्र अधिकाऱ्यांचे मोबाइल रविवारी हमखास बंद असतात किंवा त्यांच्याकडून अनेकदा प्रतिसाद मिळत नाही. त्याकारणाने वीजपुरवठा खंडित होण्याचे नेमके कारण काय, हे कळू शकत नाही. तसेच शासकीय रुग्णालय, खासगी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक यंत्र लावलेले असतात. सदर यंत्र विजेशिवाय चालूच शकत नाही. त्याकारणाने जनरेटर सुरू न झाल्यास किंवा अचानक काही समस्या निर्माण झाल्यास विजेचा लपंडाव रुग्णांच्या जिवावरही बेतू शकतो. या सर्व प्रकाराची दखल अधीक्षक अभियंता सुहास मेहत्रे यांनी घेऊन नागरिकांना चांगली विद्युत सेवा द्यावी, अशी मागणी विद्युत ग्राहकांनी केली आहे.
लहान मुलांना वाफारा देताना त्रास
वातावरणात अचानक बदल झाल्याने चिमुकल्यांना या दिवसांत सर्दी-पडसे सतावते. मुलांच्या उपचाराकरिता पालक बालरोगतज्ज्ञांकडे धाव घेतात. नेब्यूलायझर (वाफारा) ने वाफ देत असताना अनेकदा वीजपुरवठा खंडित झाल्याने उपचार अर्ध्यावरच सोडावा लागतो. जिल्ह्यात किडनीच्या रुग्णांमध्येही वाढ झाली असून, त्यांना नियमित डायलिसिसवर ठेवावे लागते. हा उपचार सुरू असताना, अनेकदा बत्ती गूल होत असल्याने डॉक्टरांना जनरेटर लावण्याकरिता धावपळ करावी लागल्याच्या अनेक घटना पुढे आल्या आहेत. यामुळे सर्व बाबींकरिता वीज ही महत्त्वाची असून, असा विजेचा लपंडाव थांबवावा, अशी शहरातील डॉक्टरांचीही मागणी आहे.
नवजात शिशूच्या जीवितालाही धोका
नवजात शिशूचे तापमान व्यवस्थित ठेवण्याकरिता असलेले वार्मरस मशीन तथा व्हेंटिलेटरला उच्चदाबाची वीज हवी असते. वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने नवजात शिशूच्या जिवालाही धोका निर्माण होऊ शकतो. अनेक नवजात शिशूंना सलाइन देताना ते अत्याधुनिक यंत्रणावर सेट करूनच द्यावी लागते. त्या यंत्राला उच्चदाबाची विद्युत लागते. अशावेळी विद्युत पुरवठा खंडित झाल्यास डॉक्टरांना जनरेटर सुरू करण्याकरिता धावपळ करण्यात किमान चार ते पाच मिनिटे जातात. सदर मशीन गरम व्हायलाही वेळ लागत असल्याने अशा स्थितीत नियोजन चुकून नवजात शिशूच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असते तसेच मशीन नव्याने सेट करावी लागते, असे मत बालरोगतज्ज्ञ अद्वैत पानट यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. अतिदक्षता विभागातील अत्याधुनिक यंत्रणाकरिता २४ तास वीजपुरवठा आवश्यक आहे. मात्र, अचानक वीजपुरवठा खंडित होत असेल, तर रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.

Web Title: The power of the light is worthless!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज