‘बिजली-रॉकेट’ने मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 10:09 PM2018-09-09T22:09:49+5:302018-09-09T22:10:14+5:30
येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित जनता कृषितंत्र विद्यालयामार्फत पोळा सणाचे औचित्य साधून रविवारी झालेल्या पोळा उत्सवात स्थानिक कोर्णाक कॉलनीतील वैभव इंगळे यांच्या बिजली, रॉकेट नामक बैलजोडीने अव्वल येण्याचा बहुमान पटकाविला. हा उत्सव गेल्या ४० वर्षांपासून आयोजित केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित जनता कृषितंत्र विद्यालयामार्फत पोळा सणाचे औचित्य साधून रविवारी झालेल्या पोळा उत्सवात स्थानिक कोर्णाक कॉलनीतील वैभव इंगळे यांच्या बिजली, रॉकेट नामक बैलजोडीने अव्वल येण्याचा बहुमान पटकाविला. हा उत्सव गेल्या ४० वर्षांपासून आयोजित केला जात आहे.
रूरल इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात थाटात पार पडलेल्या पोळा उत्सवाच्या अध्यक्षस्थानी दिलीप इंगोले, तर विशेष पाहुणे म्हणून खा. आनंदराव अडसूळ होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य नंदकिशोर चिखले, प्रमोद देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे, राजेश वानखडे, शशांक देशमुख, गौरव सोनी, गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, विलास काळे आदी उपस्थित होते. दरम्यान पाहुण्यांच्या हस्ते पोळा उत्सवात सहभागी होणाऱ्या बैलजोडी मालकांचा दुपट्टा, टोपी, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. पोळा उत्सवात दिवसेंदिवस बैलांची संख्या रोडावत असल्याबाबत आयोजकांनी चिंता व्यक्त केली. बैलजोडी सजावट स्पर्धेचे परीक्षण एन.डी. राऊत, अे.ओ, खंडारे, प्रमोद गावंडे, विलास काळे, धनजंय मोहोड आदींनी केले. यावेळी प्रथम क्रमांकाचे बक्षीस स्थानिक कोणार्क कॉलनीतील वैभव इंगळे यांच्या बिजली, रॉकेट नामक बैलजोडीने पटकाविला. शिल्ड, अहेर, बैलांचा साज आणि रोख ९५०० रूपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले. दुसरा क्रमांक नवसारी येथील रामराव वानखडे यांच्या बैलजोडीला शिल्ड, अहेर, बैलांचा साज आणि रोख ५५०० रूपये, तर तिसºया क्रमांकाचे बक्षीस नितीन ठाकरे यांच्या बैलाजोडीला शिल्ड, अहेर, बैलांचा साज आणि रोख ३६०० रूपये देण्यात आले. चवथा क्रमांक येथील प्रादेशिक संशोधन केंद्राच्या बैलजोडीला शिल्ड, अहेर, बैलांचा साज आणि रोख १००१ रूपये देण्यात आला. पाचव्या क्रमांकाचे बक्षीस जनता कृषितंत्र विद्यालयाच्या बैलजोडीने पटकावले. शिल्ड, अहेर, बैलाचा साज आणि रोख ५०१ रूपये बहाल करण्यात आला. संचालन व आभार प्रदर्शन मुकेश देशमुख यांनी केले.