प्रधानमंत्री आवास योजनेत अमरावती जिल्हा विभागात अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 04:22 PM2018-08-28T16:22:19+5:302018-08-28T16:23:01+5:30
राज्यात दुस-या स्थानी : ३४ हजारांपैकी ११ हजार ३८१ घरकुल पूर्ण
- जितेंद्र दखने
अमरावती - प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामात अमरावती जिल्हा विभागात प्रथम ठरला, तर राज्यात १० हजारांपेक्षा अधिक घरकुले पूर्ण करणा-या जिल्ह्यांमध्ये राज्यात दुसरा क्रमांकावर असल्याचे एका सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले. याशिवाय पंडित दीनदयाल योजनेंतर्गत घरकूल जागा खरेदी अर्थसाह्य योजनेत राज्यात तिस-या क्रमांवर आहे. सोबतच घरासाठी जागा नसलेल्या कुटुंबांना जागा उपलब्ध करून देण्यात जिल्ह्याने बाजी मारली आहे.
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी शासनाने सन २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षांसाठी ३४ हजार घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी अमरावती जिल्ह्याने सन २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षांच्या कालावधीत राज्यात १० हजारांपेक्षा जास्त घरकुले पूर्ण करण्यात यश मिळवित राज्यात प्रथम क्रमांकावर नाशिक, तर दुस-या क्रमांकावर अमरावती जिल्हा ठरला आहे. अमरावती जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेने ३४ हजार घरकुलांपैकी सन २०१६-१७ मध्ये ११ हजार ६४९ पैकी ८ हजार २२४, तर २०१७-१८ मध्ये १६ हजार ३४५ पैकी ३ हजार ५७१ घरकूल जुलैअखेरपर्यंत पूर्ण केले आहेत. यामधील घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. यासोबतच पंडित दीनदयाल योजनेंतर्गत जिल्हाभरातील १३६ लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी ३६ लाख रूपयांचे अनुदान वाटप केले आहे.
या योनजेत जिल्हा राज्यात तृतीय स्थानावर आहे. याशिवाय जे कुटुंब अतिक्रमण करून राहत होते, अशा २ हजार ३४५ अतिक्रमणे नियमानुकुल केले आहे. या दोन्ही योजनेत अमरावती जिल्ह्याने विभागात प्रथम स्थान मिळविले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत मागील तीन वर्षांत माघारलेल्या अमरावती जिल्ह्याने घरकुलांची ८९ टक्के कामे पूर्ण केली आहेत.
शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा १४ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व अधिनस्त असलेली यंत्रणायाकरिता जोमाने कामाला लागली आहे. येत्या दिवाळीपर्यंत घरकुलांचे काम पूर्ण करण्याचा मानस जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाने केल्याचे प्रकल्प संचालक के.एम. अहमद यांनी सांगितले.
१ सप्टेंबर रोजी मुंबईत गौरव
प्रधानमंत्री आवास योजनेत अमरावती जिल्ह्याने घरकूल योजना, पंडित दीनदयाल योजना व अतिक्रम नियमानुकुल करण्यात उकृष्ट कामगिरी केली आहे. याची दखल घेत शासनामार्फत जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिका-यांचा मुंबई येथे १ सप्टेंबर रोजी गौरव केला जाणार आहे.
चांदूर बाजार तालुक्याची बाजी
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्याने १ हजार ३०७ घरकुलांची कामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे विभागात प्रधानमंत्री आवास योजनेत उकृष्ट कामगिरी करण्यात तालुक्याने बाजी मारली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्हाभरात १० हजारांहून अधिक घरकुलांची कामे पूर्ण झाली. काही कामे प्रगतीपथावर आहेत. पंडित दीनदयाल योजना, अतिक्रमणे नियमानुकुल करणे आदी कामे सर्व अधिकारी व कर्मचा-यांच्या सहका-याने होऊ शकली. दिवाळीपर्यंत घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. - मनीषा खत्री, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती