बाधित शेतकरी वाऱ्यावर ; प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कंपनीचेच चांगभले
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: May 14, 2024 12:51 PM2024-05-14T12:51:39+5:302024-05-14T12:52:10+5:30
Amravati : शेतकरी, राज्य, केंद्र शासनाचा ३८२.३४ कोटींचा प्रीमियम जमा, ४८.७७ कोटींची भरपाई
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एक रुपयात सहभाग असल्याने गतवर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा योजनेत विक्रमी ५.१२ लाख शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभला. यासाठी - पीक विमा कंपनीकडे ३८२.३४ कोटींचा हप्ता जमा करण्यात आला. हंगामात सर्वच पिकांचे नुकसान झाले. - त्यातुलनेत कंपनीद्वारा फक्त ४८.७७ कोटींचा परतावा बाधित शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे बाधित शेतकरी वाऱ्यावर अन् कंपनीचेच उखळ पांढरे झाल्याचे चित्र आहे.
राज्य शासनाने मोठा गाजावाजा करीत एक रुपयात पीक विमा योजनेत शेतकरी सहभागाची घोषणा केली. त्यामुळे गतवर्षीच्या खरीप हंगामात या योजनेला उच्चांकी ५.१० लाख शेतकऱ्यांचा सहभाग लाभला. त्यातच जुलै ते ऑगस्टदरम्यान ११ महसूल मंडळांत पावसाचा २० ते २५ दिवस खंडदेखील राहिला होता व त्यापूर्वी जुलैमधील अतिवृष्टीनेही पिकांचे मोठे नुकसान झाले. शिवाय सोयाबीन काढणीच्या काळातही अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या सर्व आपत्तीसाठी बाधित १.१२ लाखावर शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे तक्रारी नोंदविल्या होत्या. यातील बहुतांश तक्रारी कंपनीद्वारा तांत्रिक कारणांचा आधार घेत फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे पीक विमा कंपनीवर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.
स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभावे, यासाठी शेतकरी पीक विम्यात सहभाग घेतात. मात्र, एकदा शेतकरी सहभाग लाभल्यानंतर त्या शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडले जात असल्याचा अनुभव शेतकरी घेत आहेत. पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले आहे. कृषी विभागाने वारंवार पत्र दिले, एफआयआर करण्याची तंबी दिली, त्यानंतरही फारसा फरक पडल्याचे दिसत नाही.
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पावसाअभावी बाधित ४१ महसूल मंडळांसाठी काढलेली अधिसूचना पीक विमा कंपनीद्वारा ग्राह्य न धरता त्यावर अपील केले होते. विभागीय आयुक्तांसह राज्याच्या कृषी सचिवांनी पीक विमा कंपनीचे आक्षेप फेटाळत चांगलेच फटकारले होते. केंद्र शासनाकडे अपील केल्यानंतर कंपनीचे आक्षेप ग्राह्य धरण्यात आले होते.
कंपनीद्वारा भरपाई
नैसर्गिक आपत्ती - ३७.५० कोटी
प्रतिकूल हवामान - ९.३८ कोटी
काढणीपश्चात नुकसान - २.८३ कोटी
आतापर्यंत परतावा - ४८.७७ कोटी
कंपनीकडे प्रीमियम जमा
शेतकरी सहभाग हिस्सा - ५.१० लाख
राज्य शासन हिस्सा - २२४.६० कोटी
केंद्र शासन हिस्सा - १५७.६९ कोटी
एकूण प्रीमियम जमा - ३८२.३४ कोटी
तालुकानिहाय प्रीमियम अन् मिळालेला परतावा
अचलपूर तालुक्यात २०.४६ कोटींचा प्रीमियम (२ कोटी परतावा), अमरावती २९.७८ कोटी (३.१९ कोटी), अंजनगाव २७.५२ कोटी (१०.५७ कोटी), भातकुली २९.८१ कोटी (३.९८ कोटी), चांदूर रेल्वे २५.९१ कोटी (३.१२ कोटी), चांदूरबाजार २४,१७ कोटी (२.९० कोटी), चिखलदरा १०.६२ कोटी (३० लाख), दर्यापूर ४६.७७ कोटी (२.१४ कोटी), धामणगाव ३२.०३ कोटी (२.०२ कोटी), धारणी १७.८२ कोटी (१.८१ कोटी), मोर्शी ३०.५८ कोटी (४.९९ कोटी), नांदगाव ४४.७५ कोटी (१०.९१ कोटी), तिवसा २४.९७ कोटी (८४ लाख) व वरुड १७.३६ कोटी प्रीमियम जमा, ९४ लाखांची भरपाई देण्यात आली.
पीक विमा कंपनीने अपात्र ठरविलेल्या पूर्वसूचना, यासह शेतकऱ्यांच्या तक्रारी या अनुषंगाने १७ मे रोजी बैठक बोलाविली आहे. पीक विमा भरपाईसाठी कंपनीकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी