वाढीव मालमत्ता कराच्या जीआरची प्रहारने केली होळी; महापालिकेवर धडक मोर्चा
By उज्वल भालेकर | Published: August 29, 2023 05:24 PM2023-08-29T17:24:00+5:302023-08-29T17:25:56+5:30
महापालिका आयुक्तांना निवेदन, जीआर रद्द करण्याची मागणी
अमरावती : महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर वाढवून सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक बोजा टाकला आहे. मालमत्ता कर वाढीचा निर्णय हा मनपा क्षेत्रातील रहिवासी नागरिकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने मंगळवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिकेवर धडक मोर्चा काढत मालमत्ता कर वाढीच्या जीआरची होळी देखील करण्यात आली. तसेच एक महिन्यात कर कमी न झाल्यास अधिक तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला.
प्रहारच्या या आंदोलनामध्ये महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी वाढीव मालमत्ता कर रद्द करण्याबरोबरच, मनपांतर्गतच येणाऱ्या बडनेरा शहरातील गौतम बुद्ध वार्ड (फुकट नगर) वस्तीला अधिकृत झोपडपट्टी घोषित करावे, बडनेरा शहरातील सर्व झोपडपट्टी धारकांना पीआर कार्ड तत्काळ वाटप करावे, प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. बडनेरा नवी वस्ती येथील बस स्थानक ते दुर्गापूर रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडले असून त्या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी संपर्क प्रमुख गोलू पाटील, बडनेरा शहर उमेश मेश्राम, शहर संघटक श्याम इंगळे, उप महानगर प्रमुख सुधीर मानके, विक्रम जाधव, नंदू वानखडे, मनिष पवार, अंकुश पंचवटे, कुणाल खंडारे, मुकेश गोसावी, बंडू मेश्राम, पियुष गेडाम, विजय मेश्राम, सिद्धांत बोरकर, गौरव मेश्राम, साहिल शेंडे, स्वप्नील मेश्राम, अमन राऊत आदी उपस्थित होते.