अन् मदतीअभावी तडफडत ‘त्यांनी’ सोडले प्राण !

By admin | Published: November 19, 2015 12:42 AM2015-11-19T00:42:38+5:302015-11-19T00:42:38+5:30

दुचाकीने जाताना अपघात झाला. रक्ताच्या थारोळ्यात तिघे पडलेले. बघ्यांची गर्दी जमलेली. जो-तो हळहळतो.

Pran died due to lack of help. | अन् मदतीअभावी तडफडत ‘त्यांनी’ सोडले प्राण !

अन् मदतीअभावी तडफडत ‘त्यांनी’ सोडले प्राण !

Next

माणुसकी उरलीय कोठे? : मुलीच्या आक्रोशानेही द्रवले नाही बघ्यांचे हृदय
संदीप मानकर अमरावती
दुचाकीने जाताना अपघात झाला. रक्ताच्या थारोळ्यात तिघे पडलेले. बघ्यांची गर्दी जमलेली. जो-तो हळहळतो. कुणी थांबलेला तर कुणी बघून पुढे निघून गेलेला. अपघाताची वार्ता कळताच एका जखमीची मुलगी पोलिसांच्या आधी घटनास्थळी पोहोचली. वडिलांची रक्तबंबाळ अवस्था बघून तिने मदतीसाठी आक्रोश सुरू केला. प्रत्येकाजवळ विनवणी करून पित्याचे प्राण वाचविण्याचे साकडे घातले. मात्र, तेथे जमलेल्यांपैकी कोणालाही पाझर फुटला नाही. शेवटी त्या मुलीला तिच्या पित्याला गमवावे लागले. या हृदयद्रावक घटनेनंतर कुठे गेलीय माणुसकी, हा प्रश्न मात्र प्रकर्षाने बोचू लागला आहे.
मंगळवारी दुपारी पाऊण वाजताची वेळ होती. एक गृहस्थ खोलापूरवरुन अमरावतीकडे दुचाकीने जात असताना झांजी या गावाजवळ विरुध्द दिशेने येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. भर रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात चौघे जण पडले. त्यातील दोघांच्या डोक्याला गंभीर तर एकाच्या नाकाला गंभीर इजा झाली. तर एक जण किरकोळ जखमी झाला. सर्वप्रथम अमरावती येथील एका सामाजिक कार्यात रस असलेल्या तरूणीला हा अपघात दिसून आला. तिने दुचाकी थांबवून इतरांच्या मदतीने अपघातग्रस्तांच्या भ्रमणध्वनीवरुन त्यांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली. इतकेच नव्हे तर त्या मार्गाने ये-जा करणारी वाहने थांबवून अपघातातील जखमींना रूग्णालयात नेण्यासाठी आर्जवदेखील केले. पण, पोलिसांच्या पुढच्या ससेमिऱ्याच्या धास्तीने कोणीही मदतीचा उदारपणा दाखविला नाही.
पश्चात या अपघातात मरण पावलेले खोलापूर येथील बाबाराव रावळे यांच्या कुटुंबाला अपघाताची माहिती देण्यात आली. थोड्या वेळाने घटनास्थळी एका वृत्तपत्राचे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्तेदेखील पोहोचले. त्यांनी प्रथम खोलापूर पोलिसांना सूचना देऊन आरोग्य विभागाच्या १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेला पाचारण केले. परंतु ही रूग्णवाहिका भातकुलीवरुन झांझी येथे पोहोचेपर्यंत बराच वेळ उलटून गेला होता.
पाऊण तास चालली मदतीची याचना
अमरावती : पोलीसही सूचना मिळाल्यानंतर तब्बल अर्ध्या तासाने घटनास्थळी पोहोचले. वाहन उपलब्ध नसल्यामुळे उशीर झाला, असे एका पोलिसाने खासगीत सांगितले.
विशेष म्हणजे, पोलीस पोहोचण्यापूर्वी मृत बाबाराव रावळे यांची मुलगी माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचली होती.
वडिलांची रक्तबंबाळ अवस्था बघून हादरलेल्या या मुलीचा मदतीसाठी गोंधळ सुरू होता. बघ्यांना ती मदतीची मागणी करीत होती. वडिलांना इस्पितळात नेण्यासाठी ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसोर हात जोडत होती. परंतु कोणालाच पाझर फुटत नव्हता. अपघातस्थळी अनेकांची गर्दी होती. त्यात स्वत:ला समाजसेवी म्हणविणारे होते, कथित राजकीय नेते होते तर सर्वसामान्य जनताही होती. मात्र, पोलिसांची भानगड नको म्हणून कोणीही अपघातग्रस्तांची मदत केली नाही. शेवटी अपघातग्रस्तांचे प्राण वाचलेच नाहीत.
या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. संवेदनशील मने अंतर्मुख करणारी ही घटना आहे. माणुसकी कुठे हरवलीय, हा प्रश्न देखील यामुळे निर्माण झाला आहे. अमरावती विभागात दोन वर्षात अपघातात १५०० पेक्षा अधिक नागरिकांचे प्राण गेलेत. अपघातग्रस्तांना मदत केल्यानंतर पोलिसांकडून चौकशा सुरू होतात. मदत करणाऱ्यालाच चौकशांना सामोरे जावे लागते. असे अनेकांना वाईट अनुभव असल्याने लोक अपघातग्रस्तांना मदत करण्यास धजावत नाहीत, हे वास्तव आहे. मात्र, समाजाता रूजत असलेली ही भावना चुकीची आहे. त्रयस्थांचा अपघात कोरड्या नजरांनी पाहणारे आपण आपल्या आप्तस्वकियांच्या मदतीसाठी मात्र धावपळ करतो. हिच भावना इतरांसाठीही ठेवल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. या अपघातातही जखमींना वेळीच मदत मिळाली असती तर बाबाराव रावळे (खोलापूर) व सीताराम खडसे (बुधागड) यांचे प्राण वाचू शकले असते, हे नक्की.

Web Title: Pran died due to lack of help.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.