अंघोळ करणाऱ्या महिलेला ‘चुपचुपके’ न्याहाळणाऱ्यास दिला प्रसाद
By प्रदीप भाकरे | Published: May 31, 2023 06:27 PM2023-05-31T18:27:04+5:302023-05-31T18:27:42+5:30
Amravati News एका महिलेला अंघोळ करताना न्याहाळणाऱ्या आरोपीला पकडून चांगलाच चोप देण्यात आला. त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
प्रदीप भाकरे
अमरावती: एका महिलेला अंघोळ करताना न्याहाळणाऱ्या आरोपीला पकडून चांगलाच चोप देण्यात आला. त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. ३० मे रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. याप्रकरणी एका विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी आरोपी मोहम्मद नाजीस अब्दुल कय्युब याच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, ३० मे रोजी दुपारी २.३० च्या सुमारास एक विवाहिता घरातील बाथरूममध्ये आंघोळ करीत होती. दरम्यान २५ वर्षे वयोगटातील एक तरूण बाथरूमचा पडदा उघडून आपल्याला पाहत असल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यामुळे तिने पतीला आवाज दिला. त्या आरडाओरडीदरम्यान तो पळून गेला. मात्र महिलेने पतीच्या दुचाकीवर बसून लगेचच आरोपीचा पाठलाग केला. गाडगेनगरकडे पळून जात असताना महिलेच्या पतीने त्याला पकडले. त्यावेळी मोहल्ल्यातील नागरिक देखील तेथे गोळा झाले. पैकी काहींनी त्याला चांगला चोप देखील दिला. तथा त्याला त्याचे नाव विचारण्यात आले.
घटनेबाबत लागलीच गाडगेनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान आरोपी मो. नाजीस हा त्या भागात महिनाभरापासून चकरा मारत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींने सांगितले. दरम्यान, आरोपीने केलेल्या प्रकारामुळे आपल्याला लज्जा निर्माण झाल्याची तक्रार त्या विवाहितेने नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरूनच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.