पेरणीपूर्वही काढता येणार पीक विमा
By admin | Published: June 28, 2014 11:21 PM2014-06-28T23:21:08+5:302014-06-28T23:21:08+5:30
हवामानावर आधारित पीक विमा योजना ही जिल्ह्यातील खरीपाच्या सोयाबीन, कपाशी, मूग व उडीद पिकासाठी लागू करण्यात आली. अपुरा पाऊस, पावसातील खंड, अती पाऊस या तीन हवामान घटकाच्या
मुदत ३० जून : पीक बदल झाल्यास कळवावी लागणार माहिती
अमरावती : हवामानावर आधारित पीक विमा योजना ही जिल्ह्यातील खरीपाच्या सोयाबीन, कपाशी, मूग व उडीद पिकासाठी लागू करण्यात आली. अपुरा पाऊस, पावसातील खंड, अती पाऊस या तीन हवामान घटकाच्या धोक्यापासून शेती पिकाला संरक्षण मिळते. जिल्ह्यात खरीपाच्या पेरणी आता सुरवात होत असताना पीक विम्याची मुदत ३० जून २०१४ संपत आहे. या पार्श्वभूमिवर पेरणीपूर्व देखील पीक विमा काढता येऊ शकतो. मात्र पेरणीपश्चात पीक बदल झाल्यास शेतकऱ्यांना या बदलाची माहिती शेतकऱ्यांना बँकेला व कृषी विभागाला कळवावी लागणार आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ ४५ मि. मी. पाऊस झालेला आहे. खऱ्या अर्थाने पेरणीला शुक्रवारपासून सुरवात झाली आहे. कपाशी पिकासाठी १० जून ते १० जुलै दरम्यान ८० मि. मी. पेक्षा कमी पाऊस झाल्यास प्रत्येक १० मि. मी. करीता २७५ रूपये आहे याची नुकसान भरपाई २२०० प्रति हेक्टरपर्यंत मिळू शकते. यामध्ये ८८० रूपये प्रति एकर अशी मर्यादा सिमीत करण्यात आली आहे. हवामानावर आधारित पीक विमा योजनेचा महत्वाचा ट्रिगर कमी पर्जन्यमान आहे. २५ जून ते ३१ आॅक्टोबर दरम्यान पर्जन्यमान तसेच पावसातील खंड यावर पीक विम्याचे संरक्षण आधारित आहे.
सोयाबीन पिकासाठी २० जून ते ५ जुलै दरम्यान ८० मि.मी. पेक्षा कमी पाऊस पडल्यास १४०० रूपयेपर्यंत प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळू शकते. ही मर्यादा एकरी ५६० रूपयेपर्यंत आहे. २० जून ते १५ आॅक्टोबरपर्यंत पिकाला संरक्षण मिळू शकते. या कालावधीत अति पाऊस किंवा पावसामध्ये खंड पडल्यास प्रति एकर ३०० रूपये प्रति हेक्टरी ७५०० रूपये विम्याचे संरक्षण मिळू शकते. योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थ्याने विमा हप्ता शेतकरी पुरावा म्हणून ७/१२ उताऱ्यासह अर्जासोबत बँकेत विमा हप्ता भरणे गरजेचे आहे.
सोमवार दि. ३० ला संपणार मुदत
जिल्ह्यात पथदर्शी स्वरुपात राबविण्यात येणाऱ्या हवामानावर आधारित पीक विम्याची मुदत सोमवार दि. ३० जूनला संपत आहे. जिल्ह्यात पेरणीला सुरुवात होत असतानाच मुदत संपत असल्याने शेतकऱ्यात संभ्रम निर्माण झाला होता परंतु पेरणीपूर्वीही पीक विमा काढता येतो परंतु पेरणी पश्चात पीक बदल झाल्यास याची माहिती कृषी विभागासह बँकेला कळवावी लागणार आहे.
योजनेला मिळू शकते मुदतवाढ
खरीप २०१४ हंगामासाठी हवामानावर आधारित पीक विमा योजनेची मुदत ३० जूनला संपत आहे. जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचा खंड पडल्यामुळे खरीपाच्या कपाशी, सोयाबीन, मूग व उडीद पिकाची लागवड झालेली नाही. यासाठी कृषी विभागाद्वारा १५ जुलै २०१४ पर्यंत योजनेला मुदतवाढ मागितलेली आहे. कृषी आयुक्त कार्यालये प्रस्ताव पाठविण्यात असल्याने कृषी विभागाने सांगितले. तुर्तास या हवामानावर आधारित पीक विमा योजनेला मुदतवाढ मिळालेली नाही. (प्रतिनिधी)