ऑनलाइन शाळांची पूर्व तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:10 AM2021-06-24T04:10:32+5:302021-06-24T04:10:32+5:30
अमरावती : प्रवेशोत्सव नाही, स्वागत नाही, शाळा सजावट नाही आणि विद्यार्थीही नाही अशा स्थितीत २८ जूनपासून शाळा सुरू होणार ...
अमरावती : प्रवेशोत्सव नाही, स्वागत नाही, शाळा सजावट नाही आणि विद्यार्थीही नाही अशा स्थितीत २८ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. ऑनलाईन शिक्षणाचे हे सलग दुसरे वर्ष राहणार आहे. शिक्षक शाळेत आणि विद्यार्थी घरी, अशी स्थिती पहिल्या दिवसापासूनच राहणार आहे.
विदर्भातील शाळा २८ जून रोजी सुरू होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी यंदाचे शैक्षणिक सत्रदेखील ऑनलाइन स्वरूपातच होणार आहे. शहरासह ग्रामीण भागातील शाळांनी त्यादृष्टीने तयारी चालविली आहे. मागील शैक्षणिक सत्राप्रमाणे यंदाही ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे. दहावी आणि बारावीच्या सर्व शिक्षकांना शाळेत हजर राहावे लागणार असून, इतर वर्गाच्या शिक्षकांसाठी ५० टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे. विद्यार्थी घरी आणि शिक्षक शाळेत अशी परिस्थिती शिक्षण विभागाचे आदेशामुळे निर्माण झाली आहे. दरम्यान गत वर्षाप्रमाणे यंदाही ग्रामीण भागासह महापालिकेच्या शाळा आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणाची अडचण येणार आहे. पालकांकडे ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांपर्यंत योग्यप्रकारे शिक्षण पोहोचू शकले नव्हते. यंदाही कमी अधिक प्रमाणात ही स्थिती कायम राहणार असल्याचे दिसून येत आहेत.
बॉक्स
दीड महिन्याचा ब्रिज कोर्स
महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने ४५ दिवस म्हणजेच दीड महिना ब्रिज कोर्स तयार केला आहे. दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या या कोर्समध्ये मागील वर्षातील महत्त्वाच्या घटकांची उजळणी घेऊन त्यानंतर विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासमालेची लिंक पाठविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांकडून स्वाध्याय सोडून घेण्यात येणार आहेत. गतवर्षी अशाप्रकारचे शिक्षण देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, साधनांअभावी बहुतांश विद्यार्थ्यांपर्यंत योग्यप्रकारे शिक्षण पोहोचू शकले नाही. यंदाही ऑनलाईन शिक्षणाची हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.