गावागावांत मुनादी; कोरोना समित्या झाल्या ॲक्टिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:13 AM2021-05-09T04:13:00+5:302021-05-09T04:13:00+5:30
धामणगाव रेल्वे : जिल्ह्यात तिसरा क्रमांकाचे सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या धामणगाव तालुक्यात असताना ...
धामणगाव रेल्वे : जिल्ह्यात तिसरा क्रमांकाचे सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या धामणगाव तालुक्यात असताना शासनाच्या त्रिसूत्रीचे पालन न करणाऱ्यांवर आता थेट पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई होणार आहे. दरम्यान कडक निर्बंधाच्या अंमलबजावणीसाठी गावागावांत मुनादी देण्यात आली असून, कोरोना समित्या ॲक्टिव्ह झाल्या आहेत.
तालुक्यात कोरोना संक्रमण दिवसेंदिवस वेग धरत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात ही संख्या ७० टक्क्यांनी अधिक आहे. शहरात सकाळी ११ नंतर निर्बंध पाळले जात असले तरी ग्रामीण भागात एकाच कट्ट्यावर बसणे, किराणा दुकान, पान टपरी सुरू ठेवणे, मास्क न लावणे असे प्रकार घडत आहे. त्यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भागात ३० ते ५३ वयोगटातील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. जिल्हा प्रशासनाने रविवार ९ मेपासून सात दिवसांकरिता कडक निर्बंध लावले आहेत. तहसीलदार गौरवकुमार भळगाठीया व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माया वानखडे यांनी सर्व तालुका नियंत्रण समिती व गावागावांतील कोरोना समितीला अधिक जागृत राहण्याचे निर्देश दिले आहेत.
गावात वाढणाऱ्या कोरोना
रुग्णांची संख्या पाहता दररोज चाचणीचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण आढळल्यास तात्काळ माहिती तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर यांना माहिती द्यावी लागणार आहे. गावागावांत गठित समितीतील तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आशा स्वयंसेविका पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष, जि. प. शाळेतील शिक्षक यांनी या कडक निर्बंध काळात अधिक सतर्क राहून गावात याचे पालन व्हावे, अशा सूचना केल्या आहेत. त्यासाठी गावागावांत मुनादी देण्यात आली आहे.
कोट
कोरोनाच्या त्रिसूत्रीचे सूचनेचे पालन न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश कोरोना समित्यांना देण्यात आले आहेत. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावात प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. शहर किंवा ग्रामीण भागात विनाकारण फिरताना दिसल्यास त्यावर थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
- जितेंद्र जाधव,
उपविभागीय पोलीस अधिकारी, चांदूर रेल्वे