‘हुक्का फ्लेवर’च्या डब्यावर सावधगिरीचा इशारा
By admin | Published: June 21, 2017 12:04 AM2017-06-21T00:04:54+5:302017-06-21T00:04:54+5:30
"सावधान तंबाखू सेवन आरोग्यासाठी हानिकारक"अशी सावधगिरीची सूचना काफीला हुक्का पार्लरमधील ‘हुक्का फ्लेवर’च्या डब्यावर आढळून आला आहे.
काफीला हुक्का पार्लर प्रकरण : नमुने प्रयोगशाळेत रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : "सावधान तंबाखू सेवन आरोग्यासाठी हानिकारक"अशी सावधगिरीची सूचना काफीला हुक्का पार्लरमधील ‘हुक्का फ्लेवर’च्या डब्यावर आढळून आला आहे. याफ्लेवरचे नमुने तपासणीकरिता न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पोलिसांनी रवाना केले आहेत.
शहरात हुक्का पार्लर संस्कृतीचे बिज रोवणाऱ्या या व्यावसायिकांनी तरूणाईला तंबाखुजन्य पदार्थांचे व्यसन लावले आहे. एकीकडे सिगारेट, विडी व तंबाखुजन्य पदार्थांमुळे कॅन्सरचा धोका निर्माण होत असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टर व्यक्त करतात तर दुसरीकडे तंबाखू सेवन आरोग्यास हानिकारक असल्याचा छापील या पदार्थांवरील पॅकिंगवरून दिला जातो. असे असतानाही तंबाखुजन्य पदार्थाच्या सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अड्डा २७ या हुक्का पार्लरचा भांडाफोड झाल्यानंतर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शहरातील सर्वच हुक्का पार्लर बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या मनाई हुकुमाला आव्हान देत काफीला हुक्का पार्लरच्या चालकांनी पार्लर सुरूच ठेवले होते. गुन्हे शाखेने आस्था कॅफे व रेस्टॉरेंट नावाने चालणाऱ्या या हुक्का पार्लरवर धाड टाकली. तेथून तीन हुक्कापट व तीन विविध फ्लेवरचे डबे जप्त केले. यामध्ये पान १६०, मगाई फ्लेवर व महरब्बा किवाम फ्लेवरचा समावेश आहे.या डब्यावर ‘ए-१ आयान’ असे अंकित असून १ हजार रूपयांत या फ्लेवरचा एक किलोचा डबा उपलब्ध आहे.
आरोग्यासाठी हानीकारक
अमरावती : विविध फ्लेवरची आॅनलाईन खरेदी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ‘तंबाखुजन्य पदार्थ आरोग्यास हानिकारक’ असल्याचा छापील इशारा विविध फ्लेवर्सच्या डब्यांवर अंकित असल्याने यात तंबाखुचा वापर झाल्याचे स्पष्ट होते.
सिगारेट, सुगंधी तंबाखू व गुटखा सेवनाचा घातक परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळे यासर्वच पदार्थांच्या पॅकिंवर सावधगिरीचा इशारा देण्याचे शासनाने बंधनकारक केले आहे. हुक्का पार्लरमध्ये आढळलेले हे फ्लेवर्स आरोग्यासाठी घातक असल्याचे यावरून दिसून येते.