जाणवू लागल्या दुष्काळाच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 11:58 PM2017-11-15T23:58:27+5:302017-11-15T23:58:53+5:30

परिसरातील कोरडे जलसाठे उन्हाळ्यातील संभाव्य भीषण दुष्काळाचे संकेत देत असून जीवापार जपलेल्या संत्राबागा यावर्षी कशा वाचवायच्या, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

Predatory drought | जाणवू लागल्या दुष्काळाच्या झळा

जाणवू लागल्या दुष्काळाच्या झळा

Next
ठळक मुद्देबेनोडा परिसरात जलसाठे कोरडे : संत्रा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी, दर्यापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अत्यल्प पावसाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
बेनोडा शहीद : परिसरातील कोरडे जलसाठे उन्हाळ्यातील संभाव्य भीषण दुष्काळाचे संकेत देत असून जीवापार जपलेल्या संत्राबागा यावर्षी कशा वाचवायच्या, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
तालुक्यात संत्रा उत्पादकांची संख्या मोठी असल्यामुळे ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून वरूड प्रसिद्ध आहे. मात्र मागील २५-३० वर्षांपासून सततचा दुष्काळ आणि खोलवर जात असलेली भूजल पातळी यामुळे विहिरी कोरड्या पडल्यात. संत्राझाडे जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी बोअरवेलची कास धरली आणि हजार बाराशे फुटांपर्यंत बोअरवेल केले. दरम्यान सन २००२ मध्ये वरूड तालुका अतिशोषित जाहीर झाला.
वरूड तालुका ड्रायझोनमध्ये असला तरीही बेनोडा परिसरातील पळसोना, मांगोना, धामणदस, माणिकपूर, नागझरी शेतशिवाराचा पाणीप्रश्न अत्यंत गंभीर आहे. हा संपूर्ण परिसर सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असून मृगबहराचा हुकमी पट्टा आहे. मृगाच्या संत्र्यांना मार्च महिन्यापर्यंत आणि फळे तोडल्यानंतर एप्रिलपर्यंत सिंचन करावे लागते. साधारणत: ३०-३५ वर्ग किमी. क्षेत्रातील या परिसरातून ढवळागिरी ही एकमेव नदी वाहते. तिला यंदा पूर आलेला नाही. छोटे ओढेही यावर्षी हवे तसे खळखळले नाहीत. या भागात शासनाने माणिकपूर धरण, बेनोडा पाझर तलाव, देवखळा (पळसोना) प्रकल्प व मांगोना धरण, कोल्हापुरी बंधारे बांधले. मात्र, या जलसाठ्यात नैसर्गिक जलस्त्रोतच सक्षम नसल्याने याही वर्षी राज्यभरातील कधीही न भरणारी मोठी धरणे तुडुंब भरली असताना येथील जलसाठे कोरडेच आहेत. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून नालाखोलीकरणाची आणि बंधाºयांची कामे झाली. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेतून जलाशये गाळमुक्तही झालीत. मात्र परिसराच्या भूजल पातळीचा टक्का काही वाढला नाही. दोन वर्षांपासून परिसरातील शेतकरी टँकरद्वारे पाणी देऊन संत्राबागा वाचवित आहेत. मात्र महागडे पाणी देणे शक्य नाही. सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्याची जबाबदारी जनप्रतिनिधींची आहे.

अपुऱ्या पावसाचा कपाशीवर परिणाम
संकटांची मालिका : मूग, उडीद, सोयाबीनचे उत्पादन अत्यल्प

लोकमत न्यूज नेटवर्क
येवदा : दर्यापूर तालुक्यातील येवदा परिसरात शेतकऱ्यांना अपुºया पावसाचा फटका बसल्याचे चित्र आहे. खरीप हंगामामध्ये मूग, उडीद, सोयाबीन या पिकाचे अत्यल्प पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कपाशी पीकही ऐन कापूस घरी येण्याच्या काळात करपू लागले आहे. कमी पावसामुळे कपाशीला हा फटका बसला असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
येवदा परिसरातील सासन, पिंपळखुटा, रामागढ, घोडचंदी, जैनपूर, पिंपळोद, सागरवाडी, जोगरवाडी, एरंडगाव, राजखेडा, वरुड बु., वडनेर गंगाई, उमरी, तेलखेडा, काथखेडा, वडाळ गव्हाण, सांगळूद यासारख्या अनेक गावांमध्ये शेतकºयांनी उडीद, मूग, सोयाबीन, कपाशी आणि तुरीची लागवड केली. परंतु अस्मानी संकटामुळे मूग, उडीद, सोयाबीन या पिकानी शेतकऱ्यांची घोर निराशा केली. मागील वर्षी सुद्धा याच पिकाने अति पावसामुळे ऐन तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता.
कर्जबाजारी शेतकरी कपाशी व तुरीच्या पिकावर आशा ठेवत कर्जबाजारी होऊन पिकाचे संगोपन करण्यावर अतोनात खर्च केला. परंतु त्या पिकावरसुद्धा बोंडअळी व लाल्याचा प्रादुर्भाव झाल्याने व अपुºया पावसाने आतापासूनच कपाशी पीक सोकायला लागले आहे.
शेतकरी त्यामुळे अतिशय चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांबरोबरच शेतमजुरांची दयनीय अवस्था झाली आहे. शेतमजुरांंना अनेक दिवसांपासून काम नाही. येवद्यातील शेतमजूर काम नसल्याने बाहेरगावात काम शोधत आहे. त्यामुळे या परिसरात आर्थिक व्यवहारात मंदी आली आहे.
शासनाने शेतकºयांकरिता अनेक योजना आखल्या आहेत. परंतु त्या योजनेची अंमलबजावणी का होत नाही? त्यामुळे या योजनेचा फायदा गरजू शेतकऱ्यांना मिळत नाही. दरवर्षी उत्पादन खर्च वाढत असताना शेतमालाचे भाव मात्र वाढत नाही. त्यामुळे अस्मानी व सुल्तानी संकटांचा सामना करावा लागत आहे, असे मत शेतकरी व्यक्त करू लागला आहे.
पिकविम्याचे पैसेही मिळाले नाही
यावर्षी परिसरातील मूग, उडीद, सोयाबीन या पिकांची आणेवारी शून्य टक्के आहे. शेतकऱ्यांची अवस्था अतिशय हलाखीची असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात मात्र घोर निराशाच पडली आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पीकविमा काढूनसुद्धा पीकविमा कंपनीने पंचनामा करूनसुद्धा शेतकऱ्यां ना नुसते आशेवर ठेवले जात आहे.


बेनोडा नजीकच्या पाच प्रकल्पात शाश्वत जलसाठा आहे. मात्र दुष्काळबाधित क्षेत्र त्यापेक्षा अधिक उंचीवर असल्याने उपसा सिंचन योजनेशिवाय पर्याय नाही. दुष्काळ निवारणासाठी लवकरात लवकर पावले उचलावी लागतील अन्यथा परिसर देशोधडीला लागेल.
- मनोज ठाकरे
संत्राउत्पादक शेतकरी, बेनोडा

Web Title: Predatory drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.