अंदाज चुकला अन् घात झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 05:00 AM2021-12-30T05:00:00+5:302021-12-30T05:00:58+5:30
मृतांच्या हाता-पायाची अवस्था बघून हळहळ व्यक्त केली. करंट लागताच त्यांची पादत्राणे निसटली. रक्ताने माखलेले त्यांच्या पायाचे ठसे घटनेची भयावहता दर्शविणारे होते. घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. ११ केव्हीची ती विद्युत वाहिनी कॉटन मार्केट फीडरवरून कठोरा गावाकडे जाते. त्यावरील विद्युत खांबांची उंची नऊ मीटर असून जमीन व विद्युत वाहिनीमधील अंतर सुमारे २० फूट आहे. पोलीस पंचनाम्यानुसार ‘त्या’ शिडीची उंची २० फुट ५ इंच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दुपारी १२ वाजताची वेळ. कठोरा मार्गावरील पी.आर. एज्युकेशन इन्स्टिट्यूटसमोरील मुख्य प्रवेशद्वाराबाहेर लोखंडी शिडी सरकविण्याच्या प्रयत्नात असलेल्या ‘त्या’ चौघांना अवघ्या काही क्षणात मृत्यू आपल्याला कवेत घेईल, याची पुसटशीही कल्पना नव्हती. त्यांचा अंदाज चुकला अन् घात झाला. वीज प्रवाहाची तीव्रता इतकी भयावह होती की, त्या धक्क्यामुळे ते चौघेही काळे निळे पडले. त्यांच्या हात व पायाचा अक्षरश: कोळसा झाला. शिडी पकडून असलेले त्यांच्या हाताची त्वचा भाजून निघाली. त्यामुळे त्यांचा संपर्क शिडीशी तुटला आणि ते चौघेही माग कोसळले. काहींनी हा अपघात ‘याची देही याची डोळा’ अनुभवला.
मृतांच्या हाता-पायाची अवस्था बघून हळहळ व्यक्त केली. करंट लागताच त्यांची पादत्राणे निसटली. रक्ताने माखलेले त्यांच्या पायाचे ठसे घटनेची भयावहता दर्शविणारे होते. घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. ११ केव्हीची ती विद्युत वाहिनी कॉटन मार्केट फीडरवरून कठोरा गावाकडे जाते. त्यावरील विद्युत खांबांची उंची नऊ मीटर असून जमीन व विद्युत वाहिनीमधील अंतर सुमारे २० फूट आहे. पोलीस पंचनाम्यानुसार ‘त्या’ शिडीची उंची २० फुट ५ इंच आहे. वाहिनीखालून शिडी अलगद जाईल, असे त्यांना दूरवरून वाटले. मात्र, त्यांचा अंदाज जिवावर बेतला.
घरातील कर्ता गमावल्याने आईचा आक्रोश
संजय दंडनाईक हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील रहिवासी होते. ते भूषण आणि चेतन ही दोन मुले व पत्नीसह येथील आदर्श नेहरूनगरात भाड्याच्या घरात २० वर्षांपासून राहत होते. पोटे एज्युकेशन इंस्टिट्यूटमध्ये शिपाई पदावर कंत्राटी कर्मचारी होते. घरातील कर्ती व्यक्ती गेल्याने नातवासह सुनेचे कसे होणार, असा टाहो फोडत आक्रोश त्या करीत होत्या.
टाकळी जहागीर येथील ते दोघे अविवाहित
टाकळी जहागीर येथील अक्षय साहेबराव सावरकर, गोकुल वाघ हे अविवाहित होते. संसार फुलण्याआधीच त्यांचा बळी गेल्याने नातेवाइकांचा आक्रोश झाला. त्यांच्या घरात ते कमावते असल्याने आई-वडिलांचा आधार गेल्याचे दु:ख व्यक्त होत आहे.
व्यवस्थापनाकडून कुटुंबांना मदत, नोकरी
मृताच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ लाख रुपये सानुग्रह मदत देण्यात येईल, शिवाय त्या चारही कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यात येणार असल्याची माहिती पी.आर. पोटे पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे किशोर देशमुख यांच्याकडून देण्यात आली.
चार महिन्याच्या मुलाचे छत्र हरपले
शिराळा येथील प्रशांत शेलोरकर यांचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना चार महिन्याचा मुलगा आहे. कुटुंबाची धुरादेखील प्रशांतच्या खांद्यावर होती. त्यामुळे शेलोरकर कुटुंब कोलमडले आहे. चारही मृतांच्या कुटुंबीयांवर या घटनेमुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पालकमंत्र्यांचे निर्देश
रंगरंगोटीच्या कामादरम्यान शिडी उचलताना वीजतारेच्या स्पर्शाने चौघांचा मृत्यू झाला. याचे गांभीर्य लक्षात घेता याबाबत तातडीने चौकशी करून मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मोबदला मिळण्याच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले आहे. यादरम्यान त्यांचे प्रतिनिधी अरविंद माळवे यांनी इर्विन रुग्णालयाला भेट दिली.
खासदारांची एन्ट्री
खासदार नवनीत राणा यांनी इर्विनमध्ये शवविच्छेदन कक्षात मृतांच्या नातेवाइकांची भेट घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त नातेवाइकांनी ज्यांच्या संस्थेत ही घटना घडली, ते का येत नाही, ते आल्याशिवाय आम्ही मृतदेह उचलणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. बराच वेळ खा. नवनीत राणा यांनी त्यांच्या नातेवाइकांना धीर देत सांत्वन केले.