प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जिल्हाकचेरीवर धडक
By admin | Published: January 31, 2017 12:29 AM2017-01-31T00:29:47+5:302017-01-31T00:29:47+5:30
तिवसा तालुक्यातील शिवणगाव, शेंदोळा बु। येथील प्रकल्पग्रस्तांना अनेक दिवसांपासून धरणासाठी
अमरावती : तिवसा तालुक्यातील शिवणगाव, शेंदोळा बु। येथील प्रकल्पग्रस्तांना अनेक दिवसांपासून धरणासाठी संपादित केलेल्या शेतजमिनीचा मोदबला अद्यापही मिळाला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी विविध मागण्यांसाठी जिल्हा कचेरीवर धडक दिली व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
शिवणगाव आणि शेंदोळा येथील शेतकऱ्यांची जमीन शिवणगाव लघु पाटबंधारे प्रकल्पात गेलेली आहे. सदर प्रकल्प पूर्णत: तयार झालेला आहे. पाणीसुद्धा धरणात अडविण्यात आले आहे. सदर प्रकल्पात आमच्या जमिनी गेल्या असल्यामुळे त्याच्या मोबदल्याचा एक टप्पा आधी मिळाला आहे. त्याला आता जवळपास दोन वर्षे होत आहेत. परंतु, मोबदल्याचा दुसरा टप्पा सदर शेतकऱ्यांना अद्यापपावेतो मिळालेला नाही.
लघु पाटबंधारे विभागाकडे चौकशी केली असता, त्यांनी आम्हाला सांगितले की, आम्ही तुमचे पैसे भू-संपादन विभागाकडे जमा केलेले आहेत. भूसंपादन विभागाकडे चौकशी केली असता तुमचे पैसे आमच्याकडे अद्यापपर्यंत पोहोचलेले नाहीत, असे सांगण्यात येत आहे. परंतु, अद्याप पर्यंतही प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा उर्वरित मोबदला शेतकऱ्यांना दिलेला नाही. तो त्वरित देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी संजय देशमुख, विठ्ठल बानाईत, अविनाश धस्कट, अशोक तेलंगे, सुमन वैद्य, माधुरी राठोड, प्रल्हाद धस्कट, देवीदास खंडारे, पुंडलिक कुरेकर, अंजना खंडारे, दत्ता कुचे, डिहीये, रूपराव खंडारे, इंदू धस्कट आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)